भारतात कोरोना लसीकरणाचा वेग वाढला असून येत्या १ एप्रिलपासून ४५ वयाहून अधिक असलेल्या सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जब तक दवाई नही, तब तक ढिलाई नही’ असा मंत्र दिला होता. मात्र लस घेतल्यानंतरही आपल्या शरिराभोवती एखादे कवच तयार होत असल्याची तुमची धारणा असेल तर ती आताच मनातून काढून टाका. कारण कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोविडचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील कृष्णा जाधवर (वय ३५) यांनी कोरोना लसीचे दोन डोज घेतले होते, तरिही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कृष्णा जाधवर हे महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक या पदावर हडपसर, पुणे येथे कार्यरत आहेत. ३ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२१ दरम्यान त्यांनी भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोज घेतले होते. त्यानंतर २४ मार्च रोजी जाधवर यांची तब्येत बिघडली. हलकासा ताप, सर्दी जाणवू लागल्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार २६ मार्च रोजी मिलिटरी हॉस्पिटल, पुणे येथे जावून RT-PCR चाचणी केली. सायंकाळी जेव्हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तेव्हा जाधवर यांना विश्वासच बसला नाही. तसेच जाधवर यांच्या पत्नी आणि मुलीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना धक्काच बसला. मात्र परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली. सध्या तिघांच्याही तब्येतीत सुधारणा होत आहे.

या सर्व प्रसंगाबाबत आपला महाराष्ट्रशी बोलताना जाधवर म्हणाले की, माझी परिस्थिती सांगण्याचा हेतू लसीकरणावरुन लोकांचा विश्वास उठावा, हा नाही. उलट लस घेतल्यानंतरही लोकांनी काळजी घेत राहणे गरजेचे आहे. आपल्याला आता काही होणार नाही या अविर्भावात कोणीही राहू नये. यापुढे “दवाई भी और कडाई भी” या नियमाचे पालन अत्यावश्यक असल्याचे जाधवर सांगतात.
अभिनेते परेश रावल यांना देखील कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांनीही ९ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता. तसेच महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंयज मुंडे यांनी देखील काही दिवसांपूर्वीच लस घेतली होती. मात्र त्यांनाही दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
Unfortunately, I have tested positive for COVID-19. All those that have come in contact with me in the last 10 days are requested to please get themselves tested.
— Paresh Rawal (@SirPareshRawal) March 26, 2021