भारतातील क्रीडाप्रेमींसाठी २०२१ हे वर्ष अगदी एखाद्या सुवर्णस्वप्नाप्रमाणेच होतं. अहो… क्रिकेट जरावेळ बाजूला ठेवा, आता थोडं ऑलिम्पिकबद्दल बोलूयात. २०२१ मध्ये झालेली टोकियो ऑलिम्पिक्स भारतासाठी आतापर्यंतची सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरली. जे खेळ आपल्याला आजतागायत माहितसुद्धा नव्हते त्या खेळांची नावे आपल्याला या ऑलिम्पिकमुळे माहित पडले.
नीरज चोप्रा, मीराबाई चानू, बजरंग पुनिया हे खेळाडू नाव लोकांच्या तोंडावर येऊ लागली. नीरज चोप्राच्या सोशल मीडियावर तर वादळाप्रमाणे फॉलोअर्स वाढले. सांगायचा मुद्दा हाच की गेल्या वर्षात २०२१ मध्ये क्रिकेट शिवाय इतर खेळही बऱ्यापैकी प्रसिद्ध झाले. सध्या ऑलिम्पिकची पुन्हा चर्चा होत आहे. कारण येत्या ४ फेब्रुवारीपासून विंटर ऑलिम्पिक म्हणजेच हिवाळी ऑलिम्पिक सुरु होत आहे. मात्र येथे लक्षणीय गोष्ट अशी की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भलामोठा ताफा गेला होता मात्र आता होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये तसे चित्र दिसणार नाही आहे. कारण चीनची राजधानी असलेल्या बीजींगमध्ये होणाऱ्या विंटर ऑलिम्पिक्समध्ये भारताचा अवघा एक खेळाडू सहभागी होतोयं.
नाव – आरिफ खान
राहणार – जम्मू काश्मीर
दर चार वर्षांनी होणाऱ्या उन्हाळी ऑलिम्पिकप्रमाणेच दर चार वर्षांनी बर्फातल्या खेळांच्या स्पर्धा हिवाळा ऑलिम्पिकमध्ये पार पडतात. ज्यात स्नोबोर्डिंग, स्किईंग, आईस हॉकी असे विविध खेळले जातात. यंदाच्या विंटर ऑलिम्पिकमध्ये भारताकडून मोहम्मद आरिफ खान हा एकमेव खेळाडू मैदानात उतरेल. आरिफ हा जम्मू काश्मीर राज्याचा रहिवाशी असून अल्पाईन स्किईंग या क्रीडाप्रकारात तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
लहानपासूनच आरिफला स्कीईंगची आवड
आपल्या भारतात स्किईंग हा स्पर्धेचा खेळ आहे या बद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. बहुतांशी हनीमून आणि ट्रिपला गेल्यावरच स्किईंग करतात आणि तेही फक्त परफेक्ट कॅन्डीड फोटो यावा म्हणून. मात्र आरिफ हा मूळचाच जम्मू काश्मीर असल्याने बर्फ त्याच्यासाठी नवीन नव्हता. त्याला लहानपणापासूनच स्किईंगची आवड जडली होती.
हे वेड त्याला कसं लागलं, यामागेही एक मजेशीर किस्सा आहे. त्याच्या वडिलांच गुलमर्गमध्ये स्किईंगसाठी लागणाऱ्या सामानाचं दुकान आहे. वयाच्या चौथ्या वर्षीच आरिफच्या हातात बॅट, बॉल येण्याऐवजी थेट स्कीईंगची साधनंच आली आणि तेव्हापासूनच या धाडसी खेळाचं खुळ त्याच्या डोक्यात शिरलं. त्यानंतर १० वर्षांचा असताना तो स्पर्धात्मक स्कीईंगकडे वळला आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलेच नाही.