आज मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलनाचं अस्त्र उगारलं. रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार बूट पॉलिश करणाऱ्यांना रेल्वे स्टेशनच्या आवारात व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी रितसर टेंडर भरावं लागणार आहे. मात्र हातावर पोट असलेल्या बूट पॉलिश कामगारांनी टेंडरसाठी पैसे कुठून आणायचे? गेल्या दोन वर्षात कोरोना संक्रमणामुळे बूट पॉलिश कामगारांची आर्थिक अवस्था अत्यंत दयनीय झालेली असताना त्यांच्यावर हा आर्थिक बोजा का लादला जातोय? असा प्रश्न आहे. यामध्ये खासगी ठेकेदारांकडून दलाली घेऊन त्यांना हे टेंडर देण्याचा छुपा अजेंडा तर खेळला जात नाही आहे ना अशी शंकाही बूट पॉलिश कामगारांकडून निर्माण केली जात आहे.
संपूर्ण मुंबईत रेल्वे स्थानकांवर बूट पॉलिश करणाऱ्यांची संख्या जवळपास १२०० च्या घरात आहे. म्हणजे रेल्वेच्या या नव्या नियमामुळे एकूण १२०० बूट पॉलिश कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढून सदर प्रश्न मार्गी लावावा, अशी बूट पॉलिश कामगारांची मागणी आहे.