Home ताज्या बातम्या मुंबई लॉकडाऊन संदर्भात आयुक्त चहल यांचे महत्वाचे वक्तव्य

मुंबई लॉकडाऊन संदर्भात आयुक्त चहल यांचे महत्वाचे वक्तव्य

233
0

मुंबईत सध्या तरी लॉकडाऊनची गरज नाही, असं मुंबईचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी निर्बंधांबाबत देखील भूमिका मांडली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशभरात आणि राज्याप्रमाणेच मुंबईत देखील कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. त्यात ओमायक्रॉन असणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढते आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत २० हजार रुग्ण रोज आढळले, तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूतोवाच केले होते. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संभाव्य लॉकडाऊनविषयी भिती आणि चिंतेचं वातावरण होतं. मात्र, आता खुद्द पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीच यासंदर्भात लॉकडाऊनची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईतली सध्याची परिस्थिती पाहता मुंबईत सध्यातरी लॉकडाऊनची गरज नाही, असं आयुक्त चहल यांनी स्पष्ट केलं आहे. एबीपीशी वृत्तसमूहाला मुलाखत देताना, त्यांनी याबाबतची पालिका प्रशासनाची नेमकी भूमिका मांडली आहे.

“मुंबईत काल (गुरुवारी) कोरोनाचे २०,१८१ रूग्ण मिळाले होते. त्यापैकी फक्त ११० लोक ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. ११८० लोक रुग्णालयात दाखल झाले. शासकीय व खासगी रुग्णालयातील ३५ हजार पैकी फक्त ५९९९ बेड भरले आहेत. ८४ टक्के बेड रिकामे आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर नगण्य आहे, बेड रिकामे आहेत. या पार्श्वभूमीवर कोणत्याही लॉकडाऊनची गरज नाही”, असं इक्बालसिंग चहल म्हणाले.

लॉकडाऊनचे नेमके निकष काय?

“३० डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी आमची आढावा बैठक घेतली. ओमायक्रॉन, तिसरी लाट याबाबत पुढील उपाययोजनांवर चर्चा झाली. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा विचार करण्याची भूमिका मांडली. पण मी सांगितलं की पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचे मापदंड पॉझिटिव्हिटी रेट होते. पण आता मुंबईतले १८६ रुग्णालयांमध्ये ३५ हजार बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेचे निकष बदलून पॉझिटिव्हीटी ऐवजी पहिला निकष म्हणजे रुग्णालयात किती बेड रिकामे आहेत आणि दुसरा निकष म्हणजे ऑक्सिजनचा वापर किती होतोय असे करावेत”, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

पालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे भक्कम

“आता रुग्णांच्या आकड्याला महत्त्व राहिलेलं नाही. हॉस्पिटलची, ऑक्सिजनच्या वापराची, ऑक्सिजन बेडची स्थिती काय आहे, हे महत्त्वाचं आहे. रुग्णसंख्या कमी असतानाही ऑक्सिजनचा किंवा आयसीयूचा वापर वाढला, तर आपण निर्बंधांचा विचार करू. रुग्णसंख्या कमी-जास्त होत असेल, तर त्याचा फरक पडत नाही. आज २० हजार ४०० रुग्णसंख्या झाली आहे. काल ६४ हजार चाचण्या केल्या होत्या, आज ७२ हजार चाचण्या केल्या आहेत. पण आता आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही”, पालिकेची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे भक्कम आहे, असं आयुक्त म्हणाले.

“२१ डिसेंबरला आपल्याकडे पॉझिटिव्हिटी रेट वाढायला सुरूवात झाली. १६ दिवसांत मृत्यूचा आकडा १९ आहे. म्हणजे सरासरी दिवसाला एक मृत्यू आहे. आपल्याकडे रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर गेली आहे, पण मृत्यू सरासरी एकच आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार अतिरिक्त निर्बंधांची गरज नाही”, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

लोकल ट्रेन्स चालूच राहणार…

“मुंबई लोकलमधून दरदिवशी ६० लाख लोक प्रवास करत आहेत. सगळ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यामुळे तिथे निर्बंध घालण्याची गरज नाही. पुढे जे काही होईल, त्यावर आमचं बारीक लक्ष आहे.” असं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

Previous articleCustomer Care कॉलपासून राहा सावध; नाहीतर होऊ शकते फसवणूक
Next articleऐकावं ते नवल! कुत्रा बनून भुंकणारी ही मुलगी महिन्याला लाखो कमवते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here