मुंबई म्हटलं की लोकल प्रवास हा आलाच. मात्र कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी या सर्वसामान्य लोकांना या प्रवासावर बंदी आणली होती. या निर्णयाने सामान्य माणूस आता संताप व्यक्त करू लागला आहे. ही लोकल सेवा कधी सुरु होईल हा प्रश्न आता प्रशासनाला विचारला जात आहे. या मागणीला मुंबई महानगरपालिकेने गांभीर्याने घेतले असून सामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात १५ जुलै रोजी महत्वाची बैठक होणार आहे. यात लोकल सेवा सुरु करण्यासह इतर निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याबाबत काही घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात आला आहे. मात्र कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेऊन राज्य सरकार नियम शिथिल करण्यचा विचार करत आहे. दरम्यान कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची शक्यता आहे. अशा नागरिकांना कार्यालयात आणि इतर ठिकाणी जाण्याची परवानगी देण्याचा विचार पालिका करत आहे.
या मागणीवर मुंबई शहराचे पालकमंत्री असल्म शेख यांनी माध्यमांना सांगितले की ट्रेनमध्ये लोकांना प्रवास करण्याची संधी देता येईल का, हॉटेल दुकानांची वेळ कशी वाढवता येईल, कपड्याची दुकानं कशी उघडता येईल हे आम्ही पाहत आहोत. ट्रेनचा विचार करताना तिसऱ्या लाटेचा विचार करावा लागतोय, 100 टक्के लोकांना त्रास होतोय हे मान्य आहे. सगळ्या पॅरामीटरचा विचार करतोय. जोपर्यंत 50 ते 60 टक्के लोकांना लसीकरण होत नाही तोपर्यंत लोकल प्रवास कठीण आहे.
लोकल ट्रेनबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करणं अपेक्षित आहे. चर्चेनंतर जो काही निर्णय घेण्यात येईल याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जनतेला देतील. दर शुक्रवारी टास्क फोर्सद्वारे राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जातो, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र कोरोना विषाणूचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दररोज नव्यानं कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही मोठी आहे. पहिल्या लाटेत जो कोरोना रुग्णांचा उच्चांक होता, त्या आकड्यावर सध्या कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत वस्तुस्थितीचा योग्य आढावा घेतल्यानंतरचं निर्बंध हटवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.