मुंबईकरांची सोमवारची सकाळ गारेगार झालेली पाहायला मिळाली. किमान तापमानाचा पारा थेट १३.२ अंश सेल्सिअसवर घसरला आहे. जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच पारा एवढा खाली उतरला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी लोकल प्रवाशांनी, मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांनी चांगलीच थंडी अनुभवली. आज दिवसभर थंडी वाऱ्याचा प्रभाव राहील.
मागील तीन वर्षात जानेवारी महिन्यातील आज नोंदवण्यात आलेले सर्वात कमी किमान तापमान आहे. यापूर्वी जानेवारी २०१९ मध्ये कमी १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
डिसेंबरमध्ये तापमानात घट होऊन थंडी अनुभवण्यास मिळेल, अशा प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी अनुभवण्यास मिळाली. तापमानात घट झाल्याने आल्हादायक वातावरण पाहायला मिळते. मुंबईकर स्वेटर, हुडी आणि शाल घेऊन वावरतानाचे दृश्य सोमवारी सकाळी अनेक ठिकाणी पाहण्यास मिळाले.
शनिवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. मात्र विकेण्डला गारेगार थंडीची हुडहुडी मुंबईकरांना सुखावणारी होती. सोमवारी मात्र रविवारच्या तुलनेत किमान तापमान पाच अंशाने खाली सरकले. रविवारी १८.२ अंश सेल्सिअसवर नोंदवलेले किमान तापमान सोमवारी थेट १३.२ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. सूर्य डोक्यावर आल्यावरही वातावरणात गारवा होता. गार वार सुटल्याने अनेकांनी दारे खिडक्या बंद ठेवल्या होत्या.
मागील दोन दिवसांपासून कमाल तापमान २७ आणि २६ अंश सेल्सिअसवर नोंदवले जात आहे. किमान तापमानात घट झाल्याने कमाल तापमानातही घट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मागील तीन वर्षांतील जानेवारीमधील सर्वात कमी किमान तापमानाची नोंदी
२०१९ – २५ जानेवारी १३.४ अंश सेल्सिअस
२०२० – ३१ जानेवारी १३.८ अंश सेल्सिअस
२०२१- २९ जानेवारी १४.८ अंश सेल्सिअस