कालपासून एक फेसबुक पोस्ट बऱ्यापैकी व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणाने पवार साहेबांनी त्याला केलेल्या आर्थिक मदतीसाठी त्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
आधी आपण ती पोस्ट पाहू …
साहेब….
२२ वर्षे मागे वळून पाहताना या उत्तरार्धाने माझे आयुष्य बदलले. तुमच्या उदार मदतीच्या हाताने हँड सर्जन म्हणून एक मार्ग निश्चित केला आहे. माझ्या करिअरच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही मला शिष्यवृत्ती दिली आहे, अन्यथा तो एमबीबीएसचा शेवटच्या वर्षाचा अभ्यास संपला होता. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केला आहे पण मला भेटता आले नाही, म्हणून साहेब तुमचे आभार मानण्यासाठी मी हे व्यासपीठ निवडले आहे. माझे वडील आणि तुम्ही साहेब माझे हिरो आणि आदर्श आहात कारण तुम्ही दोघांनी माझ्या व्यवसायाला आकार दिला आहे…
– डॉ. विजय आनंदराव माळशिकारे
या फोटोसोबतच डॉ. माळशिकारे यांनी एक पत्राचा फोटोही अपलोड केला आहे.
हे पत्र २३ एप्रिल २००० रोजीचं आहे. म्हणजे तब्बल २२ वर्षापूर्वीचं हे पत्र आहे. मग डॉ. माळशिकारे यांना शरद पवारांची आठवण इतक्या वर्षांनी का झाली?
आम्ही डॉ. माळशिकारे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, २२ वर्षांपूर्वी मी माझ्या उमेदीच्या वयात असताना घरातील आर्थिक चणचणीमुळे मला सतत भीती वाटायची. माझा स्वभाव थोडा भित्रा होता. पवार साहेबांमार्फत मिळालेल्या शिष्यवृत्तीनंतर मी माझे लक्ष माझ्या वैद्यकीय अभ्यासावरच केंद्रीत केले. पुढील प्रवासात मी फ्रान्सला जाऊन हात व मनगट सर्जरीचे शिक्षण घेऊन आलो. पुण्यात १० वर्षे सर्जरीचे काम देखील केले. या सर्व प्रवासात पवार साहेबांचे आभार व्यक्त करण्याचे राहूनच गेले. शिष्यवृत्तीचे पत्र आपण त्यावर अपलोड करून पवार साहेबांचे आभार मानावे असे मला वाटले. म्हणूनच मी कालची पोस्ट अपलोड केली.
आज डॉ. विजय आनंदराव माळशिकारे हे हात आणि मनगट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. गेल्या १० वर्षांपासून पुण्यात डॉ. माळशिकारे हातांची शस्त्रक्रिया करीत आहेत. पुणे विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर हातांवरील विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचे त्यांनी फ्रान्समध्ये जाऊन शिक्षण घेतले आहे. त्यांना अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन एण्ड सर्जन ऑफ ग्लास्गोची फेलोशिप सुद्धा प्रदान करण्यात आली आहे.
साहेबांप्रति कृतज्ञता भाव ठेवून डॉ. विजय अनेक गरीब रुग्णांना आपली सेवा मोफत वा माफक दरात देतात. जिल्हा परिषद शाळांमध्ये कॅम्प भरवतात. लहान विद्यार्थ्यांच्या हातातील डिफॉर्मिटीज शोधून त्यांना मोफत ट्रीटमेण्ट देतात. साहेबांचा हात विद्यार्थीदशेतच डोक्यावर मिळाल्यामुळे एक विजय डॉक्टर बनून हाताचा सर्जन झाला व आज समाजातील गरीबांच्या हातांवर उपचार करून त्यांना मदतीचा हात देत आहे.
भले ही बातमी बऱ्याच जणांना सामान्य वाटेल. पण स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. आज डॉ. विजय आनंदराव माळशिकरे हे हाताचे मोठे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. अशा कितीतरी गरजू विद्यार्थ्यांना पवार साहेबांकडून मदत मिळाली असेल. मात्र शरद पवार यांनी अशा प्रकारची मदत कधीच सार्वजनिक केली नाही.
शरद पवारांना ‘आधारवड’ असेही म्हटले जाते. त्या मागचं खरं कारण आज उमगलं.