केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीद्वारे १४ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या या वर्षीच्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) परीक्षेत तब्बल १,००२ महिलांनी बाजी मारलीयं. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक, २२ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या निर्देशानंतर यावर्षी पहिल्यांदाच महिलांनाही एनडीएच्या परिक्षेसाठी संधी देण्यात आली होती.
एकूण परीक्षार्थी ५ लाख ८५ हजार ८५६ !
वर्षातून दोन वेळा घेण्यात येणाऱ्या एनडीएच्या परिक्षेस या वेळेस तब्बल ५ लाख ८५ हजार ८५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ७७ हजार ६५४ एवढया मुली होत्या. एकूण ८ हजार उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, ज्यापैकी १,००२ महिला उमेदवार आहेत. यानंतर या महिला उमेदवारांना आता सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीनंतर वैद्यकीय चाचणी होईल आणि त्यानंतर यापैकी फक्त आणि फक्त १९ जणींना पुढील वर्षीच्या एनडीए अभ्यासक्रमासाठी निवडले जाईल.
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, यंदा पहिल्यांदाच महिलांची निवड एनडीएसाठी होणार आहे. एनडीए-२ च्या या परीक्षेत भूदल सेनेच्या २०८ पदांपैकी १०, वायुसेनेच्या १२० पदांपैकी ६ आणि नौदलाच्या ४२ पदांपैकी ३ पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.
पुण्यात होणार पुढचे प्रशिक्षण
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर महिलांसाठी एनडीए परीक्षेचा मार्ग पूर्णत: मोकळा झाला आहे. यासाठी पुण्याजवळील खडकवासला येथील एनडीए अकादमीत महिला उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक संरचनात्मक बदल करण्यात आले आहेत. मात्र पुरूष प्रशिक्षणार्थींच्या समांतर पातळीवरच महिला उमेदवारांचे प्रशिक्षण होणार आहे.
तीन वर्षांचे अग्निपरिक्षेसमान कठोर प्रशिक्षण
एनडीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महिला प्रशिक्षणार्थी, अधिकारी म्हणून भूदल, वायूदल आणि नौदलात जाऊ शकतील. यासाठी त्यांना तीन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणाला सामोरे जावे लागणार आहे. त्यांनी निवडलेल्या पर्यायानुसार त्या त्या दलाचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल. लष्करासाठी इंडियन मिलिट्री अकॅडमी, देहरादून येथे, वायुसेनेसाठी दिंडीगुल, हैदराबाद आणि नौसेनेसाठी केरळमध्ये इंडियन नेव्हल अकॅडमी ट्रेनिंग दिलं जाईल. तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर या महिला सशस्त्र सेनेत सहभागी होतील.
एकंदरितच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु झालेल्या या नव्या स्त्रीप्रभुत्व आयामामुळे, येत्या काळात देशाच्या सरंक्षणक्षेत्राला एक नवे वळण मिळेल. असा अंदाज आहे.