कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढला असून सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने आरोग्य व्यवस्थेची डोकेदुखी वाढवली आहे. युरोपमध्ये काही महिन्यांपूर्वी नवा स्ट्रेन आढळून आला होता. मात्र विमानतळावर खबरदारी बाळगल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्ट्रेन भारतात येऊ शकला नव्हता. पण भारतात म्युटेड झालेला नवा स्ट्रेन सध्या वेगाने पसरत असल्याचे वाढलेल्या रुग्णसंख्येवरुन दिसून येत आहे. त्यातच एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी सांगितल्याप्रमाणे, हा नवा स्ट्रेन कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना पुन्हा बाधित करु शकतो. तसेच यामुळे हर्ड इम्युनिटी मिळवणेही कठीण जाणार असल्याचे डॉ. गुलेरिया यांचे मत आहे.
देशातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांनी पहिल्यांदाच नव्या स्ट्रेनबाबत वक्तव्य केले आहे. आतापर्यंत आरोग्य क्षेत्रातून नव्या स्ट्रेनबाबत कुणीही भाष्य केले नव्हते. त्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग होता की, “कोरोनाच्या जुन्या रुग्णांमध्ये असलेली अँटीबॉडी नव्या स्ट्रेनवर उपयोगी नाही.”
कोरोना लसीबाबत बोलताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, कोरोनाची लस नव्या स्ट्रेनवर पुर्णपणे प्रभावी नाही. मात्र लस घेतल्यामुळे कोरोनाची वाढती रुग्नसंख्या आटोक्यात यायला मदत मिळू शकते. एका आरोग्य सर्वेक्षणातून असे आढळले आहे की, भारतात आतापर्यंत २४० प्रकारचे नवे स्ट्रेन आढळून आले आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यवतमाळ, अकोला आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हा नवीन स्ट्रेन आढळून आलेला आहे.