राज्यात वाढणारा कोरोना आणि त्यातून होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकार पुरेपूर मुकाबला करत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी शासनाकडून जनतेच्या हिताची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कालच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला व नव्या नियमावलीची माहिती दिली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुढील १५ दिवस राज्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार आता लग्न सोहळ्यासाठी देखील नवे नियम लावण्यात आले आहेत. लग्न समारंभात असलेली ५० जणांची मर्यादा कमी करून ती २५ करण्यात आली आहे. लग्न समारंभ म्हटले की यात गोतावळा आला. मात्र ब्रेक द चैन या संकल्पनेनुसार कोरोनाची खबरदारी म्हणून राज्य सरकारने यावर लग्नावर अटी घातल्या आहेत. याआधी लग्न समारंभाला ५० जणांची मर्यादा घालण्यात आली होती आता मात्र २५ जणांमध्येच लग्न उरकावे लागणार आहे. तसेच लग्न कार्यालयात आयोजकाने सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे तसेच या चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट बाळगणेही बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न केल्यास कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश राज्य शासनाने जाहीर केले आहेत.
तसेच आता कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यात असलेल्या आयोजित पोट निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाला हे नियम कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे.