केंद्र सरकारद्वारे अलीकडेच पद्मश्री पुरस्कार जाहिर करण्यात आले. त्यामध्ये आपल्या राज्यातील एक नाव विशेष होतं आणि ते म्हणजे डॉ. हिंमतराव बावस्कर. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला होता. पण रायगडमधल्या पोलादपूरसारख्या ठिकाणी शेकडो कोरोनाग्रस्त रुग्णांवर इंजेक्शनशिवाय यशस्वी उपचार करत मृत्यूदर एक टक्क्याखाली आणण्याची कामगिरी डॉ. हिंमतराव बावस्करांनी बजावली होती.
जालना येथील देहेड येथे जन्म
डॉ. हिंमतराव बावस्कर यांचा जन्म १९५१ साली जालना जिल्ह्यातील देहेड या गावातील गरिब कुटुंबात झाला होता. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने लहानमोठी कष्टाची कामे करत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. जालना जिल्ह्यातील खामगावच्या महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे शिक्षण घेऊन ते वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथून एम.बी.बी.एस. झाले. शहरात वैद्यकीय व्यवसाय करण्याऐवजी ग्रामीण भागात जाऊन रूग्णसेवा करावी असे त्यांना त्यांच्या भावाने सांगितले होते. भावाचा सल्ला मानत रायगड जिल्ह्यातील बिरवाडी या छोट्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ते रुजू झाले. सुरवातीच्या काळात त्यांना बऱ्याचशा समस्यांचा सामना करावा लागला होता. यात सरकारी अनास्थेची समस्या सर्वात मोठी होती. नेहमीच्या आरोग्याच्या तक्रारींसोबतच सर्पदशांचे आणि विंचूदंशाचे अनेक रुग्ण येत. विंचूदंशाच्या बऱ्याचशा घटनांमध्ये बहुतांशी व्यक्ती मरण पावत असल्याने त्याच्या पद्धतशीर अभ्यासाला डॉ. बावस्करांनी सुरुवात केली.
विंचूदंश उपचारावर सखोल अभ्यास
कोकणाचे हवामान विंचूच्या पुनरुत्पादनाला खूप पोषक असल्याने विंचूदंशावर खात्रीशीर उपचार उपलब्ध व्हावा ही तेथील प्राथमिकता होती. १९७६-१९७७ मध्ये त्यांनी विंचूदंशाच्या वीस रुग्णांचा अभ्यास करुन त्यांनी आपला तयार केलेला अहवाल इंडियन हार्ट जर्नलकडे पाठवला. त्यानंतर डॉ. बावस्करांनी एम.डी.मेडिसीन हे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर त्यांच्या विंचूदंशाच्या १५-२० रुग्णांच्या नोंदी व निरिक्षणावर आधारित शोधनिबंध ‘लॅन्सेट’ नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. त्यावर त्यांना जगभरातून पत्रे आली. ह्रदय बंद पडण्याच्या एका विशिष्ट प्रकारात पारंपारिक औषधांचा उपयोग होत नाही. एम.डी. झाल्यावरसुद्धा विंचूदंशावरील इलाज शोधण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. लग्नानंतर ते आपल्या पत्नीसमवेत पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. रिफ्रॅक्टरी हार्ट फेल्युअरवर उपचार म्हणून सोडियम नायट्रोप्रुसाईड औषध धोका पत्करत विषारी विंचूदंशाच्या शिकार झालेल्या ८ वर्षांच्या मुलाकरिता वापरत त्याचे प्राण वाचवले. या घटनेनंतर कोकणातील सर्वच भागातून विंचूदंशावर उपचार करायला रुग्ण मग पोलादपूरला बावस्करांच्या दवाखान्यात यायला लागले होते. सदर औषधातील जोखीम लक्षात घेऊन बावस्करांनी अभ्यास करून प्राझोसीन या दुसऱ्या औषधाची निवड केली. या औषधाचे सेवन तुम्ही तोंडानेही करु शकत होता.
महाराष्ट्रासमवेत इतर राज्यातही रुग्णसेवा
विंचूदंशावर डॉ. बावस्करांच्या संशोधनामुळे कोकण तसेच महाराष्ट्रातील रुग्णांना इलाज करता आलाच. पण त्यासोबतच कर्नाटक, आंध्र प्रदेश, पाँडेचेरी आणि गुजरात अशा राज्यांमधूनही विंचूदंशाचे रुग्ण डॉ. बावस्कर यांनी बरे केले. या सर्व राज्यांमधून विंचूदंशाने होणाऱ्या मृत्यूंच प्रमाण डॉ. बावस्करांच्या रुग्णसेवेमुळे एक टक्क्याहूनही खाली आलं होतं.
डॉ. बावस्करांचे बहुतांशी लेख लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाले. हा पण त्याकाळी एक विक्रमच होता. याखेरीज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत त्यांचे शेकडोहून अधिक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांतून मार्गदर्शन केलेले डॉ. बावस्कर संपूर्ण भारतभर अजूनही नियमितपणे व्याख्याने देत असतात.