कोरोना विषाणूने एक वर्षाहून अधिक काळा संपुर्ण विश्वात थैमान घातले आहे. भारतात कोरोना रूग्नांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिम सुरू झाली. यामध्ये नवजात बाळ, अल्पवयीन मुलांना वगळले जात आहे. दरम्यान भारतात दुसऱ्या टप्यातील लसीकरण मोहिम सुरू असून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. भारतात अद्याप ४५ वर्षांखालील व्यक्तींना लस घेण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तरूणांसाठी देखील लस उपलब्ध करण्यासाठी मागणी केली जात असताना दुसरीकडे अमेरिकन कंपनी फायजरने १२ वर्षांखालील व्यक्तींसाठी तयार केली आहे. लवकरच या लसीची मानवी चाचणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता अल्पवयीन बालकांनाही लस देण्याबाबत चर्चा सुरू आहे. अशातच फायजरने लस चाचणी सुरू केल्याने संपूर्ण जगाचे याकडे लक्ष लागले आहे.
मुलांसाठी विकसित करण्यात येणारी लस तीन डोसमध्ये देण्यात येणार आहे. सध्याच्या लसीकरणात दोन डोस दिले जातात. अमेरिकेत लहान मुलांच्या लस चाचणीतील सुरवातीच्या टप्प्यात एकूण १४४ मुले सहभागी झाले आहेत. त्यानंतरच्या टप्प्यात ४५०० मुलांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. या दरम्यान कंपनीकडून मुलांची सुरक्षिता, लस सहन करण्याची क्षमता आणि लसीमुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक क्षमता तपासली जाणार आहे. लस चाचणीचे काही टप्पे येत्या सहा महिन्यात पूर्ण होतील, असा विश्वास कंपनीने केला आहे.
याशिवाय इस्राइलमध्ये फायदर-बायोएनटेकची लस लहान मुलांसाठी सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. इस्रायलमध्ये ही लस १२ ते १६ वर्ष या वयोगटातील ६०० मुलांना देण्यात आली. याशिवाय मॉडर्ना कंपनीनेही सहा महिन्यापर्यंतच्या मुलांना लस देण्यासाठी चाचणी सुरू केली आहे. मॉडर्ना कंपनीची ही लस १२ वर्षांखालील बालकांसाठी असणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.