कोरोनापासून सरंक्षण होण्यासाठी लसीकडे खात्रीशीर उपाय म्हणून पाहिले जात आहे. त्यासाठीच १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु होतोय. या टप्प्यात १८ वयाहून पुढे असलेल्या नागरिकांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी देशात सगळीकडेच उत्साह असताना तिकडे पंजाबमध्ये एक वृद्ध प्राध्यपकाने अजब कारण देत लस घेण्यास नकार दिला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना तसे रितसर पत्रच लिहून या वृद्धाने आपली नाराजी कळवली आहे. प्राध्यापक चमनलाल असे या वृद्धाचे नाव आहे. पंजाब विद्यापीठाचे माजी अधिवक्ता आणि जेएनयू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक म्हणून चमनलाल यांनी काम केलेले आहे.
आपल्या पत्रात चमनलाल म्हणतात, “माझे वय आता ७४ आहे. मला कोरोनाची लस घेणे आवश्यक असून वैद्यकीयदृष्ट्या देखील ते उचित आहे. मात्र लस घेण्यात मला व्यक्तिगत आणि सामाजिक अडचण जाणवतेय. पंजाब आणि ओघाने भारतीय नागरिक असल्याकारणाने मला माझी अडचण आपल्या समोर मांडायची आहे. या कारणामुळेच मी अद्याप लस घेतलेली नाही.”
“निश्चितच लसीकरणामुळे हजारो लोकांचे प्राण वाचणार आहेत. तरिही मी लस घेतली नाही. कारण लस घेतल्यानंतर जे प्रमाणपत्र देण्यात येत आहे त्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. या प्रमाणपत्रावर त्यांच्या फोटोची गरज नसून तो बळजबरीने तिथे लावण्यात आला आहे.”, अशी तक्रार चमनलाल यांनी लिहिसेल्या पत्रात नमूद केली आहे.
चमनलाल पुढे म्हणतात, जगाच्या कुठल्याही देशाने लसीकरण प्रमाणपत्रावर कोणत्याही राजकीय नेत्याचा फोटो छापलेला नाही. लसीकरण हे राष्ट्रीय अभियान असून त्यावर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. मात्र भारतात नागरिकांना एका सत्ताधीशाचा फोटो लावून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. मी या प्रकाराचा निषेध करतो. खरंतर केंद्र सरकारच्या उदासीन धोरणामुळेच भारतात कोरोनाचा उद्रेक झाला. खासकरुन दुसरी लाट ही सरकारच्या गाफील राहण्यामुळेच आली आहे, असा आरोपही चमनलाल यांनी केला.
पुढे जाऊन तर चमनलाल यांनी आणखी एक दावा केला आहे. ते म्हणतात की, जर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो लावायचाच असेल तर मग कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या मृत्यू दाखल्यावर देखील मोदींचा फोटो लावायला हवा, अशी मागणीच त्यांनी केली आहे. आपला विरोध त्यांनी मुद्देसूद पद्धतीने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवला आहे.