Home क्राईम गेले आठ दिवस डुग्गू नेमका होता कुठे?

गेले आठ दिवस डुग्गू नेमका होता कुठे?

237
0

पुण्यातील बाणेर परिसरातून अपहरण झालेल्या चार वर्षीय स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गू या चिमुरड्याला अखेर बुधवारी दुपारी पुनावळे परिसर येथे सुखरूप सोडण्यात आले. अपहरण झालेल्या ठिकाणापासून हे ठिकाण फक्त १० किलोमीटर अंतरावर होते. गेले ८ दिवस अपहरणकर्त्यांनी डुग्गूला याच परिसरात ठेवले होते. ११ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास स्वर्णव डे केअरला जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केले होते. स्वर्णव हा डॉ. सतीश चव्हाण यांचा मुलगा असून, त्याच्या अपहरणानंतर खंडणीसाठी कोणताही फोन आला नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती, ज्यात ३०० हून अधिक पोलिसांचा समावेश होता. अखेर स्वर्णव सुखरूप घरी पोहोचल्याने त्याच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.

डुग्गू नेमका सापडला कसा?

पुनावळे येथील पाण्याच्या टाकीसमोर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी दादा राव नावाचे सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. तेथे काल १९ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास एक चेहरा झाकलेली व्यक्ती एका लहान मुलाला घेऊन आली. मुलाला तुमच्याजवळ ठेवा, मी १० मिनिटांत येतो, असे सांगून तो निघून गेला. दादा राव यांनी बराच वेळ वाट पाहिल्यावरही तो तरूण आला नाही. मुलगा रडायला लागला तेव्हा इमारतीत लिफ्टचे काम करणाऱ्या तरूणांनी मुलाकडील बॅग तपासली. त्यात त्यांना एक मोबाईल नंबर लिहिलेला दिसला. त्यावर त्यांनी फोन केल्यावर डॉ. सतीश चव्हाण यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. त्यांनी व्हिडिओ कॉल करून मुलगा दाखविल्यावर पोलिस अधिकारी आणि डॉ. सतीश चव्हाण व स्वर्णवचे काका सचिन चव्हाण सदर ठिकाणी त्या इमारतीजवळ पोहोचले व त्यांनी मुलाला ताब्यात घेतले.

अपहरणकर्त्यांचा शोध सुरू

स्वर्णवची तब्ब्येत अगदी व्यवस्थित आहे. अपहरणकर्त्यांविषयी काही धागेदोरे मिळाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सर्वांचे आशिर्वाद मिळाल्याने आमचा अर्णव सुखरूप घरी आला आहे. आमचा अर्णव आमच्यापासून नऊ दिवस दूर होता, त्यामुळे त्याला स्थिर होण्यास थोडा वेळ जाईल. माध्यमे आणि पोलिसांचे आम्ही आभार व्यक्त करतो. असे अर्णवचे डॉ. सतीश चव्हाण म्हणाले.

Previous articleघरात काम नाही म्हणून जुगार खेळणाऱ्या महिलांचा अड्डा पोलिसांनी केला उध्वस्त
Next article२४ जानेवारीपासून शिशू वर्गासकट राज्यात शाळा सुरू होणार, शिक्षण मंत्र्यांनी केली घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here