Home ताज्या बातम्या कोरोना रुग्णांची खर्रा, दारूची मागणी; नातेवाईकांनी कोविड सेंटरमध्ये टरबुजातून पाठवलं पार्सल

कोरोना रुग्णांची खर्रा, दारूची मागणी; नातेवाईकांनी कोविड सेंटरमध्ये टरबुजातून पाठवलं पार्सल

406
0
15_Apr_yavatmal
यवतमाळच्या कोविड सेंटरमधील धक्कादायक प्रकार

संपुर्ण विश्व, देश आणि राज्य कोरोनाच्या विरोधात लढत आहे. कोरोनाचा विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणा आटोकाट प्रयत्न करत आहे. मात्र लोकांमध्ये अजूनही कोरोनाबाबत गांभीर्य आलेले नाही, असे चित्र दिसते. कोरोनारुग्णांना वेळेवर उपचार मिळावे, यासाठी आरोग्य यंत्रणा राबत असताना रुग्ण मात्र याला दाद देत नाहीयेत. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची दारू आणि खर्राची मागणी पुरविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी चक्क टरबूज आणि इतर साहित्यातून हा माल कोविड सेंटरमध्ये पार्सल केला.

आरोग्य कर्मचारी कोरोना रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ लावत असतात. मात्र व्यसनाधिन रुग्णांना याचे कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसते. कोविड सेंटरमधील व्यसनाधिन रुग्णांनी खर्रा आणि दारूची मागणी केल्यानंतर नातेवाईकांनी देखील ते पुरविण्यासाठी जी शक्कल लढवली त्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे.

कोविड सेंटरमधील जेवण रुग्णांना नको असल्यास घरून जेवण पुरविण्याची मुभा दिली जाते. याचाच फायदा घेऊन काही नातेवाईकांनी टरबुजाता खर्राच्या पुड्या घालून पाठविल्या. तर काही मद्यपींना जेवण रॅप करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियमच्या पाकिटातून दारूच्या बाटल्या आत दिल्या. कोविड सेंटरच्या सुरक्षा रक्षकांना याचा संशय आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांनी आणलेले पार्सल तपासून पाहिल्यानंतर त्यात हा सर्व प्रकार उघड झाला.

यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार २०० रुग्णांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यापैकी ३ हजार २३३ रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत. तर ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १४ एप्रिलला एका दिवसात यवतमाळमध्ये ७९० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ लोकांचा मृत्यू झाला.

Previous articleपंचतारांकित हॉटेल होणार कोविड रुग्णालय, पालिकेने निर्णय केला जाहीर
Next articleकोरोना संकटानंतर आता औषधाचंही संकट, राज्यात रेमडेसिवीरची टंचाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here