Home ताज्या बातम्या “मला अरेंज मॅरेजपासून वाचवा”, चक्क बॅनर लावून पठ्ठ्याची जाहिरातबाजी.

“मला अरेंज मॅरेजपासून वाचवा”, चक्क बॅनर लावून पठ्ठ्याची जाहिरातबाजी.

211
0

 

आजच्या जगात योग्य असा जीवनसाथी शोधणं हे फार जिकरीचे काम आहे. सोशल मीडियाच्या या जगात आपण एकामेकांच्या जवळ आलो असलो तरी ते जग फक्त आभासीच आहे. नीट पाहिलं तर सोशल मीडियामुळे लोकं जवळ कमी आले आणि दुरावलेच जास्त आहेत. त्यामुळे जीवनसाथी शोधणं तर बाजूलाच राहतं आणि नातं टिकवणंच मोठी गोष्ट बनून जाते.

यावर तोडगा काढण्यासाठी ब्रिटनमधल्या बर्मिंगहमच्या एका मलिक नावाच्या पठ्ठ्याने एक चांगलीच शक्कल लढवली आहे. बर्मिंगहमच्या चौकाचौकात बॅनर लावून हा पठ्ठ्या चक्क म्हणत आहे, “Save me from arranged marriage ” (मला अरेंज मॅरेजपासून वाचवा).

या बॅनरवर सदर मजकूराशिवाय मलिकचा फोटो आणि एका वेबसाईटची लिंक आहे. ती वेबसाईट उघडल्यावर एक व्हिडीओ सुरु होतो. ज्यात सांगितले जाते की, नमस्कार, मी मलिक. तुम्ही माझा फोटो कुठल्यातरी चौकात बॅनरवर पाहिला असेल. माझे वय २९ असून, मी लंडनमधील ला विदा भागात राहतो. मी पेशाने व्यावसायिक असून मला खाण्याची खूप आवड आहे तसेच मी फार धार्मिकसुद्धा आहे. पुढे जाऊन मलिक म्हणतो की, मी एका अशा जीवनसाथीच्या शोधात आहे जी माझ्यासोबत धार्मिक कार्यात सहभाग घेईल.

मलिक हा धर्माने शीख असून त्याला शीख धर्म व पंजाबी रितीरिवाजाशी जुळवून घेईल अशी सहचारिणी हवी आहे. सदर वेबसाईटवरील फॉर्म भरून इच्छूक मुली आपली माहिती मलिकपर्यंत पोहोचवू शकतात.

या फॉर्ममध्ये तुमचे नाव, वय, धर्म अशी माहिती तुम्हाला भरावी लागेल. वेबसाईटच्या एफएक्यू(FAQ) सेक्शनमध्ये मलिक म्हणतो की, माझा अरेंज मॅरेजला विरोध नाहीये पण मला माझी जीवनसाथी स्वत:हून संशोधन करून शोधायची आहे.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मलिक म्हणतो की, आतापर्यंत एकूण १०० जणींचे अर्ज त्याला प्राप्त झाले आहेत आणि लवकरच तो त्यांची पडताळणी करणार आहे. १ जानेवारीला बर्मिंगहममध्ये लागलेले हे बॅनर १४ जानेवारीपर्यंत अस्तित्वात असतील.

बायको शोधण्यासाठी बॅनर लावण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. अमेरिकेतील मॅसेच्युएटस येथे राहणाऱ्या ६१ वर्षीय बेथ यांनी सुद्धा त्यांच्या मुलीसाठी नवरा शोधायला चक्क टाईम्स स्क्वेयर ला जाहिरात केली होती.

आपल्याकडे तरी अजून अशा प्रकारे बॅनर लावून जीवनसाथी शोधण्याचे प्रकार होत नाहीत, मात्र मध्यंतरी पुण्यात ‘शिवडे आय एम सॉरी’ चे बॅनर बरेच व्हायरल झाले होते. मात्र सिंगलतेच्या अखंड व्रताचे ब्रम्हचर्यात रूपांतर न होण्याकरिता, येत्या काळात आपल्या कडेही असे बॅनर दिसू लागले तर आश्चर्य वाटायला नको.

Previous articleऑनलाईन परीक्षेचा सेटलमेंट बादशाह राज तेवतियाला अखेर बेड्या ठोकल्या
Next articleक्लीनअप मार्शलना ओळखपत्र आणि गणवेश सक्तीचे, BMC चे नवे नियम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here