भारतात कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही फार भयंकररित्या पसरत आहे. एप्रिलच्या पूर्वार्धात भारतात एकूण २०.६५ लाख कोरोनाचे रूग्ण असल्याचे समोर आले आहे. जी भारतातली कोरोनाची आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. महाराष्ट्रात रोज ६० हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. तर देशभरातील रोजची आकडेवारी ही लाखांच्याही पुढे आहे. त्याचबरोबर नव्या स्ट्रेनमुळे मृत्यूचाही आकडा वाढलेला आहे. त्यातच आता रेमडिसिवीर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दुसऱ्या लाटेत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तर पहिल्या लाटेपेक्षा दुसरी का भयंकर आहे, याच्यावर एक नजर टाकू.
भारतातील कोरोनाचा नवा स्ट्रेन
कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारतात स्थानिक पातळीवर कोरोना म्युटेशनचा इतका गंभीर परिणाम दिसून येत नव्हता. मात्र बहुतांशी तज्ज्ञांच्या मते भारतावर सध्या ओढवलेली स्थिती ही याच नव्या म्युटेशनचे फळ आहे. ज्यातील ६० टक्के रूग्ण हे एकटया महाराष्ट्रातील आहेत.
तरूणांना धोका जास्त?
काही तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रूग्णांमध्ये तरूणांचे प्रमाण अधिक आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ही भीती व्यक्त केली होती. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर १८ ते ४० या वयोगटाला देखील लस द्यावी, ही मागणी केलेली आहे, ती याच भीतीपोटी.
केजरीवाल यांनी नुकतेच केलेल्या विधानानुसार, “दिल्लीतील एकूण रूग्णसंख्येच्या ६५ टक्के रूग्ण हे वय वर्ष ४५ च्या खालील गटातील आहेत. मात्र त्यांनी यासंदर्भातील कोणतीही शाश्वत आकडेवारी सादर केली नाही. महाराष्ट्र व केरळ सारख्या राज्यातही कोरोना संसर्गाच्या एकूण आकडेवारी पैकी ५० टक्के रूग्णसंख्या ही तरूण गटातील आहे.
वृद्ध नागरिक हे शक्यतो लाॅकडाऊनच्या नियमांमुळे घरातच राहतात. मात्र तरूण गटातील नागरिक हे कामानिमित्त सातत्याने घराबाहेर पडत असतात या कारणामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढले असल्याचे दिसते.
लहान मुलांनाही संसर्गाचा धोका
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपर्यंत एकूण ८० हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यातील सर्वाधिक आकडे हे महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि दिल्ली हया राज्यांमधील आहेत.