मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ अर्थात सर्वांच्या लाडक्या माईंची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर पुण्याच्या गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या महिन्याभरापासून त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.
‘अनाथांची माय’ म्हणून सर्वश्रृत असलेल्या सिंधुताईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास पुण्यातील ठोसर पागा येथे सिंधुताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या विधीदरम्यान त्यांना मुखाग्नी न देता दफन करण्यात आले.
यामागचं नेमकं कारण काय ? या जाणून घेऊयात.
सिंधुताईंनी समाजसेवेचा वसा स्वीकारल्यानंतर महानुभाव पंथाविषयी त्यांना आस्था वाटू लागली. कालांतराने त्या महानुभाव पंथाच्या अनुयायी देखील झाल्या. समाजसेवेखातर विविध कार्ये करत असताना, लहान लहान मुलांचे संगोपन करत असताना सिंधुताई महानुभाव पंथात सांगितल्या प्रमाणे कृष्णाची उपासना देखील करत असत. महानुभाव पंथात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्यास अग्नी दिला जात नाही तर जमिनीत दफन केले जाते. याच नियमाला अनुसरुन आज सिंधुताईंचा देखील दफन विधी करण्यात आला.
महानुभाव पंथाचा उगम
१३ व्या शतकाच्या उत्तरार्धात मूळचे गुजरातचे असलेले चक्रधर स्वामी महाराष्ट्रात आले. त्यांनी महाराष्ट्रात या पंथाचा प्रचार केला. कृष्ण भक्ती हे महानुभाव पंथाचे मूळ आहे. महानुभाव पंथ हा कृष्ण व चक्रधर स्वामींची वचने प्रमाण मानतो.
आपल्याकडे महाराष्ट्रात विदर्भात या पंथाचा मोठा प्रमाणात प्रसार झाल्याचं पाहायला मिळतं. आणि विशेष बाब म्हणजे, सिंधुताईंचा जन्मही विदर्भातील वर्धामध्ये झाला होता.
महानुभाव पंथाचे दोन प्रकार
महानुभाव पंथामध्ये एकूण दोन प्रकार मानले जातात. ज्यांनी पूर्ण दीक्षा घेतले आहे, संसार प्रपंचाचा त्याग केला आहे आणि आश्रमात राहतात अशांना भिक्षू म्हणता येऊ शकतं. दुसरे सर्व प्रापंचिक त्यांना वासनिक म्हटलं जातं.
महानुभाव पंथाची अंत्यसंस्कार प्रक्रिया
महानुभाव पंथात केल्या जाणाऱ्या दफनविधीला ‘निक्षेप’ असं म्हटलं जातं. या पंथामध्ये अग्निसंस्कार केले जात नाहीत तर पार्थिव दफन केले जाते.
महानुभाव पंथ स्वीकारलेल्या व्यक्तीला एका खड्ड्यात दफन केले जाते. त्या खड्ड्यात एक कपार केली जाते. त्या खड्ड्यात मीठ ठेवले जाते. खड्ड्यात मृतदेह ठेवल्यानंतर वरून पुन्हा एक दोन पोती मीठ टाकलं जातं. त्यानंतर शेवटी त्यावर माती टाकली जाते. पार्थिव पूर्णत: दफन करण्यापूर्वी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते.