Home ताज्या बातम्या दि ग्रेट इंडियन शेतकरी आंदोलन

दि ग्रेट इंडियन शेतकरी आंदोलन

271
0
delhi farmers protest
प्रातिनिधिक छायाचित्र

दि ग्रेट इंडियन शेतकरी आंदोलन

भारताच्या इतिहासातलं सर्वाधिक काळ चाललेले शेतकरी आंदोलन

मानवाच्या तीन मूलभूत गरजांपैकी सर्वात महत्वाची आणि प्राथमिक गरज म्हणजे अन्न. शेतकरी अन्न पिकवतो म्हणून आपण जगतो. त्यामुळे आपला शेतकरी समृद्धपणे जगला पाहिजे. पण गेल्या सहा महिन्यांपासून भारतातला शेतकरी मात्र दिल्लीच्या सीमेवर आपल्या हक्कांसाठी आंदोलन करीत आहे.

हो. सहा महिने. ब्रिटिश काळातही एवढे मोठे आंदोलन फार दिर्घकाळ चालले नव्हते. स्वातंत्र्यानंतर नर्मदा बचाव असेल किंवा इतर आंदोलने काही काळ चालून नंतर खंडीत झाली. एकिकडे देशाची कोरोनासोबतची लढाई सुरू असताना दुसऱ्या बाजूला हे आंदोलन एकही दिवस खंड न पडता सलग सुरु आहे.

गेल्या सहा महिन्यांमध्ये या आंदोलनात नक्की काय काय महत्वाचं घडलं. त्याचा हा एक छोटासा रिकॅप.

आंदोलनाचा उगम

केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले

  1. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, 2020
  2. शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक, 2020
  3. अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, 2020

मात्र या तिन्ही कायदयांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठीचं हे आंदोलन सुरू झालं. खरं पाहीलं तर पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी, कायदे मंजूर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे 21 सप्टेंबर 2020 आंदोलनाला सुरुवात केली. मात्र ऑक्टोबर महिन्यात या आंदोलनानं आक्रमक रूप परिधान केलं आणि पुढे जाऊन हे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर धडकलं.

पाकिस्तानी, खालीस्तान्यांचे आंदोलन म्हणून सुद्धा हिणवले गेले

दोन महिन्यांच्या कालवधीनंतर साधारणत: नोव्हेंबर 2020 मध्ये या आंदोलनाने देश तसेच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं. विविध देशांमधून या आंदोलनाला प्रत्यक्ष तसेच समाजमाध्यमांद्वारे समर्थन दर्शवण्यात आले. आंदोलनाला मिळत असलेल्या इतक्या मोठया स्वरूपातले समर्थन पाहून आंदोलन विरोधी गटातर्फे या आंदोलनावर दबावतंत्र टाकणे सुरू झाले. इतकेच नव्हे तर हे आंदोलन पाकपुरस्कृत व खालीस्तान्यांचे आंदोलन असल्याचा आरोपही त्यांच्याकडून झाला.

सेलिब्रिटींचे समर्थन आणि टूलकिट

आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी रिहाना, मिया खलिफा तसेच पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनीही समाजमाध्यमांद्वारे या आंदोलनाला समर्थन दर्शवले आणि याबाबत का बोलले जात नाही आहे ? असा प्रश्न समोर ठेवला. त्यादरम्यान हॅशटॅग #indiatogether हे ट्विटरवर जवळपास एक आठवडा ट्रेंडींगमध्ये होते. ग्रेटा थनबर्ग कडून टूलकिटद्वारे एक ट्विट करण्यात आले होते. पुढे जाऊन ते ट्विट डिलीट करण्यात आले होते. या टूलकिट प्रकरणावरूनही त्यावेळेला फार गोंधळ झाला होता.

२६ जानेवारीचा लाल किल्ल्यावरील हंगामा

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. दिल्लीत त्यादिवशी जवळपास सव्वा लाख ट्रॅक्टर या रॅलीसाठी आले होते. पण या रॅलीला अचानक हिंसक वळण लागले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दिल्ली पोलिसांनी शेतकरी संघटनांना ट्रॅक्टर रॅलीसाठी तीन मार्ग निश्चित करून दिले होते. पण काही शेतकऱ्यांनी आपला मोर्चा मध्य दिल्लीकडे वळवला ज्या ठिकाणी ही रॅली काढण्यासाठी पोलिसांनी स्पष्ट नकार दिला होता. या परिस्थितीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पुढे जाऊन शेतकऱ्यांचा एक गट लाल किल्ला परिसरात शिरला व तेथे त्यांनी आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी घोषणाबाजी दयायला सुरूवात केली. या साऱ्या संघर्षामध्ये 83 पोलीस जखमी झाले होते तर एका आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला होता.

पिझ्झा, मसाजवरुन उडवलेली खिल्ली

या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी उभारलेल्या तंबूमध्ये मसाज पार्लर उभारला असल्याचे फोटोज आणि व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये बरेच वायरल झाले होते. नेटकऱ्यांकडूनही या गोष्टीची बरीच खिल्ली उडवण्यात आली. तसेच आंदोलनादरम्यान शेतकरी पिझ्झा खात असल्याचे फोटोजही वायरल झाले होते. नेटकऱ्यांकडून यावरही बरीच टिका झाली होती. मात्र अभिनेत्री स्वरा भास्कर हिने या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. जे शेतकरी गहूची शेती करतात ते गहूपासून तयार झालेला पिझ्झा खाऊ शकत नाही का? असा सवाल तिने ट्रोलर्स आणि विरोधकांना केला होता.

रस्त्यात काँक्रिट ओतून बसवण्यात आले होते खिळे

प्रजासत्ताकदिनी जो काही हिंसाचार घडला त्यानंतर दिल्ली पोलिस कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नव्हते. यामुळेच सिंघू,टिकरीपासून ते गाझीपूर सीमेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू आहे त्याठिकाणी पोलिसांनी सिमेंटचं पक्कं कुंपण, काटेरी तारा आणि रस्त्याच्या मधोमध खिळे लावले होते. या संदर्भातले फोटोजही समाजमाध्यमांमधून बरेच वायरल झाले होते ज्यामुळे मोदी सरकारला बऱ्याच टिकेचा सामना करावा लागला होता.

थंडी आणि इतर कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू

सिंघू,टिकरी ते गाझीपूर सीमा या भागात शेतकऱ्यांनी तात्पुरता निवारा म्हणून तंबू उभारले आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांच्या दिल्ली हरयाणा भागात कडाक्याची थंडी पडते. परिणामी आंदोलन सहभागी असलेल्या शेतकऱ्य़ांचा थंडी आणि इतर आजांरामुळे देखील मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.

आज दिनांक 26 मे 2020. या आंदोलनाला सुरूवात होऊन सहा महिने लोटले देखील. चर्चांवर चर्चा झाल्या, खूप साऱ्या बैठका झाल्या मात्र अजूनही पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार की नाही? हे आंदोलन थांबणार की नाही? हे आता येणारा काळच ठरवेल.

Previous article‘मेरा साहब नंगा’ १४ ओळींच्या कवितेने मोदींच्या निरंकुश सत्तेची झोप उडाली
Next articleकोविड अनाथांना वाली कोण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here