राज्यात कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांना कुठे बेड उपलब्ध होत नाही. त्यातच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर केंद्र सरकारने इतर राज्यातून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरविण्याचे आदेश दिले. मात्र ऑक्सिजन टँकर वाहून आणण्यासाठी ड्राइव्हरची अडचण समोर आली. यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पुढाकार घेत एसटी कर्मचाऱ्यांना टँकरचालक म्हणून घेतल्याची माहिती राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांना दिली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शहरी भागाशी नाते नसेल तरी ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे “लाल परी”. ग्रामीण भागात प्रवासाचे मुख्य माध्यम ही सर्वस्वी एसटी आहे. याच परिवहन महामंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील ग्रामीण भागासोबत शहरी भागालाही ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. एस टी महामंडळ मागील काही काळ अडचणीचा सामना करत आहे. तरीदेखील एस टी कर्मचाऱ्यांनी या अडचणीला प्राधान्य न देता राज्यातील जनतेच्या सेवेसाठी पुढाकार घेतला आहे.
देशात कोरोनाची पहिली लाट जात असतानाच दुसरी लाट आली. आणि पुन्हा रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. ही परिस्थिती पाहता भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठीची सर्व खबरदारी राज्य सरकार घेत असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. तसेच राज्यात तिसरी लात देखील येऊ शकते अशी शंका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे राज्यात लसीकरण मोहिमेला गती आणली पाहिजे असे स्पष्ट मत परब यांनी मध्यामांपुढे मांडले आहे.
त्यासोबतच, सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात रस्ते वाहतूक करणाऱ्यांसाठी कठोर नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहितीही अनिल परब यांनी दिली आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रवासात काही कठोर निर्बंध आखले जाण्याची शक्यता आहे.