पावसाळा आला की, लोक ग्रुप पिकनिक काढून पावसाचा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनाला बाजूला करून टेंशन फ्री होण्याचा मार्ग शोधतात. मात्र सध्या राज्यात असलेल्या कोरोना परिस्थितीचा विचार केला तर ही पिकनिक आपल्याला भारी पडू शकते. मुंबईहुन जवळ असलेल्या लोणावळा हे पर्यटन स्थळ याच धोक्याचे ठिकाण होताना दिसत आहे. लोकं पिकनीकनिमित्त लोनावळ्यात गर्दी करत आहे. भुशी डॅम, टायगर पॉईंट, सनसेट पॉईंट, लोहगड अशा अनेक ठिकाणी गर्दी वाढत आहे. या गर्दीला आळा घालण्यासाठी शासनाने पर्यटनावर कठोर निर्बंध घातले आहे. लोणावळ्यात कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे लोणावळ्याला पिकनीकसाठी जाताना थोडं सबुरीनं घ्या.
राज्यात कोरोना संसर्गाला १९ महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. लोकांची घरी बसून कोंडी झाली आहे हे जरी मान्य केलं तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करणे ही काळाची गरज आहे. गर्दी करून पर्यटन स्थळांना भेट देऊन नाहक संकट ओढून घेण्याची ही वेळ नाही. सध्या लोणावळा, माळशेज घाट, भंडारदरा, नाशिक रोड अशा अनेक निसर्गरम्य ठिकाणी वाढणारी पर्यटकांची गर्दी ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला खतपाणी घालण्याचे काम करत आहे. लहानग्यांपासून वृध्दांपर्यंत सगळेच पर्यटनाचा आनंद घेताना दिसत असल्याने लोणावळा येथे शासनाकडून करण्यात येणारी कठोर कारवाई ही चुकीची नाही. ही कारवाई इतर ठिकाणीही होऊ शकेल याच वावगं काहीच नाही. त्यामुळे आपण सुजाण नागरिक बनून शासनाला सहकार्य करावे ही अपेक्षा चुकीची ठरणार नाही.