आई आणि मुलाचं नातं काही वेगळेच असते. मुलं नजरेआड गेल्यावर आईचा जीव हा कासावीस होतोच. अशी दुर्दैवी परिस्थिती तेलंगणाच्या एका आईला दोनदा अनुभवाला आली आहे. तेलंगणाच्या राहणाऱ्या रजिया बेगम यांचा मुलगा निजामुद्दीन अमन युक्रेनमध्ये अडकला आहे. रशिया-युक्रेनमधील युद्धात आपल्या मुलाच्या सुटकेसाठी त्या शर्तीचे प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रसंग पहिला नाही तर याआधीची एक घटनाही अगदी रोमांचकारक आहे.
२०२० मधील देशातील लॉकडाऊन आणि संकट याचे समीकरण कोणालाही नवीन नाही. जेव्हा देशात लॉकडाऊन लागले त्यावेळी निजामुद्दीन अमन आंध्र प्रदेश-तामिळनाडू बॉर्डरवर अडकला होता. त्यावेळी रजिया बेगम यांनी तेंगलणा ते आंध्र प्रदेश हा तब्बल १४०० किलोमीटरचा प्रवास स्टुकीवरून पार करून आपल्या मुलाला सुखरूप घरी आणले. या खडतर प्रवासात त्यांना अनेक गोष्टींशी सामना करावा लागला. मात्र मुलाच्या प्रेमासाठी त्यांनी हे अंतर पार केले.
निजामुद्दीन आता युक्रेनमध्ये सूमी स्टेट युनिव्हर्सिटी येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. रशिया-युक्रेनच्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये अनेक भारतीय अजूनही याठिकाणी अडकून आहेत. आईचे काळीज दिवसरात्र आपल्या मुलाच्या सुटकेची प्रार्थना करत आहे. रजिया यांनी दिलेल्या माहितीनुसार निजामुद्दीन आणि काही सहकारी सध्या बंकरमध्ये बंद आहे. तो ज्याठिकाणी राहतो तिथे दळणवळणाची फारशी सोय नाही. त्यामुळे निजामु्द्दीन सुखरुपरित्या स्वगृही परतावा यासाठी त्याच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.