उन्हाळा आता आपले रंग दाखवू लागला आहे. मुंबईचा पारा तब्बल ४० अंशावर गेला असून उकाड्याने अक्षरशः अंगाची लाही लाही होत असल्याचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. यापूर्वी मार्च महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच ४१. ७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद १९५६ च्या सुमारास करण्यात आली होती. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवू लागला आहे. हवामान खात्याच्या माध्यमातून ट्विट करत कुलाबा वेधशाळेचे कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुढच्या काही तासांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचे होसाळीकर यांनी म्हटले आहे.
तापमानाचा पारा चढल्याने शक्यतो दुपारच्या वेळेत घराबाहेर पडू नये. चेहरा झाकण्यासाठी रुमालाचा वापर करावा. भरपूर पाणी प्या असे आवाहन कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक जयंता सरकार यांनी केले आहे. होसाळीकर यांनीही मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले असून पुढील काही दिवस उकाडा असाच कायम राहणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा वाढल्याचे चित्र असून मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाजही होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.
का वाढलाय उकाडा
सध्या राजस्थानातून महाराष्ट्राच्या दिशेने कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याची माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक जयंता सरकार यांनी दिली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी कोकणातील काही शहरांमध्ये तापमान ४० अंशावर पोहोचल्याची माहिती सरकार यांनी दिली.
ऋतुचक्र बदलले
गेल्या काही दिवसांपासून देशातील ऋतुचक्रच बदलल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे दिसत आहे. उत्तर भारतातही उन्हाचा तडाखा जाणवत आहे. तर देशातील पूर्वेकडील राज्यांमध्ये २९ मार्च ते २ एप्रिल या काळात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.