भारतात उजव्या विचारसरणीचा एक मोठा वर्ग गेल्या काही वर्षात तयार झाला आहे. हा वर्ग पारंपारिक माध्यमांसोबत तंत्रज्ञानाच्या जोडीनेही आक्रमक हिंदुत्त्वाचा प्रसार करतोय. सध्या बुल्ली बाई ॲपच्या निमित्ताने उजव्या विचारसरणीची कट्टरता डिजिटल स्वरुपात पाहायला मिळत आहे. बुल्ली बाई प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरु केला. त्यानंतर दिल्ली पोलिसही यात सहभागी झाले. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर पोलिसांनी अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर इंटरनेटवरील डिजिटल इकोसिस्टममध्ये दोन गट तयार झाल्याचे दिसते. ‘ट्रॅड्स’ आणि ‘रायतास’ नावाच्या या गटामध्ये उजव्या विचारसरणीच्या तरुण-तरुणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे तरुणांचा हा गट उच्चशिक्षित असून तो विविध राज्यातील अभिजन म्हणून गणल्या जाणाऱ्या जातीमधून येतो. मागच्या वर्षीच्या सुल्ली डिल्स आणि बुल्ली बाई प्रकरणात ज्या आरोपींना अटक केलीये, त्यांचा शैक्षणिक, सामाजिक स्तर, त्यांच्यातील सिक्रेट ग्रुप्सचे चॅट्स यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येतायत.
ट्रॅड्स आणि रायतासची विचारसरणी आणि कार्यप्रणाली
ट्रॅड्स हा गट सनातन धर्माचे कट्टर समर्थन करतो. ज्यामध्ये धार्मिक कट्टरतावादी आणि मुस्लिम व दलितांच्या द्वेषाने पछाडलेल्या युवकांचा समावेश या गटात आहे. मुस्लिम आणि दलित जातीमधून येणाऱ्या लोकांना, नेत्यांना अत्यंत हिंसक पातळीवर जाऊन ट्रोल करण्याचे काम ट्रॅड्स नावाची जमात करते. तर रायतास हे उजव्या विचारसरणीचे आहेत. ज्यामध्ये धर्मशास्त्रापेक्षा ते अधिक हिंदुत्ववादावर विश्वास ठेवतात. रायतास हा शब्द राईटिस्ट आणि ॲक्टिविस्ट अशा दोन शब्दाची फोड करून तयार करण्यात आला आहे. ही विचारसरणी पुढे नेण्यासाठी देशात पंतप्रधानांनी धरलेला हिंदुत्वाचा अजेंडा या गटाला पुरेसा आहे.
मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, बुल्ली बाई आणि सुल्ली डील्स ॲप्सची निर्मिती करणारे आरोपी निरज बिश्नोई, ओंमकारेश्वर ठाकूर, श्वेता सिंग, विशाल कुमार झा आणि मयंक रावत हे ट्रॅड्स विचारसरणीचे आहेत. त्यांना गेल्या आठवडाभरात देशभरातून विविध ठिकाणांहून अटक केली आहे. बुल्ली बाई आणि सुल्ली डिल्सच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचा ऑनलाईन लिलाव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गेल्या वर्षी सुली डील्सची तक्रार झाली होती, तर बुल्ली बाई गेल्या महिन्यात चर्चेत आले. हे दोन ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध होत नसल्याने त्याला पर्याय म्हणून प्रसिद्धिसाठी गिटहब (GitHub) या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला.
हे दोन्ही गट सोशल मीडियावर सक्रीय आहेत. विविध पुस्तके, व्हिडिओ यावर त्यांच्यात चर्चा होत असते. वेद, हिंदू सनातन धर्म, पौराणिक कथा, पंतप्रधान मोदींची धोरणे, जातियवाद, महिलांचे हक्क, मुस्लिम, दलित आणि जागतिक राजकारण अशा अनेक मुद्यांवर ते विविध ठिकाणी विचार मांडतात. ट्विटर आणि टेलिग्रामवर मुस्लीम आणि दलित समाजावरील हल्ल्यांचे समर्थन केले जाते. त्यासाठी अश्लील, आक्षेपार्ह गोष्टींचा वापर करुन मीम्स तयार केले जातात. रायतासने शेअर केलेल्या आक्षेपार्ह मजकुरात मुख्यतः राजकीयदृष्ट्या प्रेरित मॉर्फ केलेल्या मीम्सचा समावेश असतो. ट्रेड्स मुख्यतः भगवान राम, भगवान हनुमान, जपानी ॲनिमेटेड पात्रांचे फोटो आणि मीम्सला स्वतःचे प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेवतात. सहसा हे गट मॉर्फ केलेल्या प्रतिमा आणि व्हिडिओंद्वारे मुस्लिम महिलांचा अवमान आणि अपमान करण्यावर चर्चा करतात. कधी कधी यामध्ये कार्यकर्ते, पत्रकार आणि संशोधकांचाही समावेश असतो.
आरोपी बिश्नोई, ठाकूर आणि काही अज्ञात व्यक्तींनी सुल्ली डील्स ॲप तयार केले होते. अभिजन विशेषतः ब्राह्मण वर्गातील अनेक युवकांचा अशा कार्यात महत्त्वाचा सहभाग असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईत तरी दिसून आले आहे. अशा कारस्थानामुळे समाजात असमतोल निर्माण होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर वावरत असताना द्वेषपुर्ण, हेतूपुरक एखाद्या समाज किंवा व्यक्तिची हेटाळणी करणाऱ्या मजकुरापासून सावध राहायला हवं. असा मजकूर आढळल्यास त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता, तो मजकूर फॉरवर्ड न करता त्याची माहिती सायबर पोलिसांना देणे समाजासाठी हिताचे ठरू शकते.