Home ताज्या बातम्या ‘दिसतं तसं नसतं’ सायकलवर लाकडं वाहून नेणारे ते काका खरंच गरिब आहेत...

‘दिसतं तसं नसतं’ सायकलवर लाकडं वाहून नेणारे ते काका खरंच गरिब आहेत का?

520
0
30 July Social Media Viral Pics
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो

सोशल मीडियावर हल्ली काहीही व्हायरल होतं. एखादा फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होतो आणि लोक त्यावर चर्चेचं गुऱ्हाळ चालवत राहतात. मात्र फोटो किंवा व्हिडिओमागील नेमकं सत्य काय आहे? हे सहसा समोर येत नाही. सध्या फेसबुक, व्हॉट्सअपवर एका गॅसवाल्या काकांचा फोटो व्हायरल होत आहे. भारत गॅसचा गणवेश घातलेले एक काका सायकलवर लाकडाची मोळी बांधून जात आहेत, असा एक फोटो अनेकजणांनी शेअर केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे विदारक चित्र या कॅप्शनखाली हा फोटो तुफान व्हायरल होत आहे. जो घरगुती सिलिंडर घरो घरी पोहोचवण्याचे काम करतो, त्याच व्यक्तिला स्वतःच्या घरी चूल पेटवावी लागते. असे या फोटोच्या निमित्ताने भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र फोटोमागची वस्तूस्थिती काहीतरी वेगळीच आहे.

सकाळ ऑनलाईनने सदर फोटोची सत्यता समोर आणली आहे. हा फोटो खडकवासला भागातील असून फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव मारुती गणपती थोपटे असे आहे. थोपटे सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेले आहेत. निवृत्तीनंतर ते भारत गॅस एजन्सीमध्ये गॅस घरी पोहोचवण्याचे काम करत आहेत. खडकवासला परिसरात ते ‘थोपटे मामा’ या टोपण नावाने परिचिरीत आहेत.

थोपटे मामांचा सरपण नेतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या गरिबीबद्दल लोकांनी पोस्ट लिहिल्या. मात्र वस्तूस्थिती तशी नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शन सुरु आहे. त्यांचे मुले सुशिक्षित असून बऱ्यापैकी काम करणारे आहेत. थोपटे यांची तीन मजल्याचे घर असल्याचेही सांगितले जाते. खडकवासलच्या जवळ मालखेड भागात त्यांची १५ एकर शेती देखील आहे. थोपटे यांना सुखवस्तू परिवाराची पार्श्वभूमी आहे. फक्त त्यांना बंबामध्ये पाणी तापविण्याची जुनी सवय असल्यामुळे त्याच्यासाठी ते वाळलेली लाकडे गोळा करतात.

तर सध्या व्हायरल झालेल्या फोटो थोपटे मामांच्या नकळत कुणीतरी काढलेला आहे. बंबात पाणी तापवण्यासाठी रस्त्यावर पडलेली सुकी लाडके गोळा करुन सायकलवर बांधून जात असताना त्यांच्या नकळत कुणीतरी त्यांचा फोटो काढला. थोपटे मामांच्या भारत गॅसच्या गणवेशामुळे ते घेऊन जात असलेल्या लाकडांचा संबंध जोडण्यात आलेला आहे. मात्र फोटोला ज्या लोकांनी गरिबीचे कॅप्शन दिले, तसे ते नाहीये. हे आता स्पष्ट होत आहे.

Previous articleखडतर मेहनतीच्या जोरावर २५ व्या वर्षी IPS; वैभव निंबाळकर यांचा प्रेरणादायी प्रवास
Next articleलसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here