महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखिका व पत्रकार श्रीमती पुष्पा त्रिलोकेकर–वर्मा यांचे दि. ९ जुलै २०२१ रोजी पहाटे मुंबईतील कांदिवली येथे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचे पती ज्येष्ठ पत्रकार लोकप्रभा साप्ताहिकाचे माजी संपादक प्रदीप वर्मा यांनी त्यांच्या निधनाबाबत कळवले.
पुष्पाबाईंनी आपल्या पत्रकारितेची सुरवात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्र दैनिक ‘मराठा’मधून केली. ‘मराठा’त असताना त्यांनी दिलेली बातम्यांची शीर्षके, मुलाखती, संपादकीय, विशेष वृत्त, विविध विषयावरील पुरवण्या प्रचंड गाजल्या. आणीबाणीत दैनिक ‘मराठा’ बंद पडल्यावर वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि आणीबाणीच्या निषेधार्थ सायंदैनिक ‘पहारा’ सुरु झाले. या सायंदैनिकाच्या संपादकपदाची जबाबदारी पुष्पाबाईंनी स्वीकारली. दैनिक मराठातील २० वर्षांच्या निर्भीड पत्रकारितेच्या अनुभवाचा उपयोग करून त्यांनी ‘पहारा’ला प्रतिमराठा म्हणून नावारूपाला आणले. आणीबाणीचा निषेध करणाऱ्या सभा, संमेलनांचा वृत्तांत तसेच भूमिगत नेत्यांच्या सडतोड मुलाखती कोणतीही काट्छाट न करता जशाच्या तशा प्रसिद्ध करून सरकारला सळो की पळो करून सोडले. अर्थात संपादकीय विभाग आणि प्रिंटिंग प्रेसला नोटीसा बजावण्यात आल्या. ‘अन्यथा प्रेस बंद करण्यात येईल’ या वाक्याने छापखाने भितीने ‘पहारा’चे काम करण्यास नकार देऊ लागले. अशा आणीबाणीच्या प्रसंगी ‘मराठा’तील सहकारी पुष्पाबाईच्या मदतीला आले. त्यांनी जबाबदारी घेतली. त्यामुळे ‘पहारा’च्या प्रकाशनात खंड पडला नाही. वृत्तपत्र स्वातंत्र्यलढ्याची किंमत अशा तऱ्हेने पुष्पाबाईंना मोजावी लागली. नशिबाने त्यांचा तुरुंगवास चुकला. पण सरकारी नोटीशींना उत्तर देताना दमछाक झाली. निर्भय आणि निर्भीड पत्रकारितचे हे उत्तम उदाहरण. आक्रमक पत्रकारिता आणि ओघवती भाषा त्यांनी आचार्य अत्रेंकडून आत्मसात केली होती.
त्यानंतर पुष्पाबाईंनी पत्रकारितेची दिशा दैनिकाकडून साप्तहिकाकडे वळवली. त्यांनी काही काळ ब्लिट्झमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्या मुक्त पत्रकार म्हणून लेखन करू लागल्या. साप्ताहिक श्री, साप्ताहिक लोकप्रभा, दैनिक प्रत्यक्ष, दैनिक कृषिवल, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती आदी साप्ताहिक पुरवण्यात कला – सांस्कृतिक विषयांवर लेखन सुरू केले.
पुष्पाबाईंचा आणखी एक विशेष गुण म्हणजे त्या सुगरण होत्या. त्यांच्या हातचा स्वयंपाक चाखलेले लोक ती चव आयुष्यभर विसरत नाहीत. स्वादिष्ट पाककृती करून आलेल्यांना खायला घालणे हा त्यांचा विशेष छंद होता. ‘द्रौपदीची थाळी’ हे त्यांचे पाककृतींवरचे पुस्तक अतिशय गाजले होते. खपांचे अनेक विक्रम या पुस्तकाने मोडीत काढले.
प्रतिमाशास्त्र हा पुष्पाबाईंच्या विशेष अभ्यासाचा विषय. त्यासाठी भारत भ्रमण केले. विविध ठिकाणांना भेटी देऊन अनेक खटपटी करून माहिती मिळवली. याच दरम्यान पुष्पाबाई व प्रदीप वर्मांनी ‘संस्कृती संवर्धन अभियाना’ची निर्मिती केली. त्याद्वारे या विषयाचं डॉक्युमेंटेशन करणाऱ्या विविध व्हिडिओ फिल्म्स तयार केल्या. आज प्रत्येकाच्या हाती मोबाइल आल्यामुळे व्हिडिओ ही नवलाईची गोष्ट राहिली नाही. पण २०-२५ वर्षांपूर्वीपासून पुष्पाबाई व प्रदीप वर्मा ‘संस्कृती संवर्धना अभियान’तर्फे ऑडियो-व्हिज्युअल माध्यमाद्वारे निवृत्तीनंतरच्या पैशातून पदरमोड करून अनेक डीव्हीडी ग्रंथांची निर्मिती करत होते. प्रकाशनगरी काशी, गणेशभक्ती, देवीशक्ती या डीव्हीडीं ग्रंथांचे वाचकांकडून कौतुक झाले.
पुष्पाबाईंनी त्यानंतर काही कादंबऱ्या व पुस्तकंही लिहिली. प्रकाशनगरी काशी, देवांची जन्मकथा, पृथ्वीचे मारेकरी (प्रदूषण विषयावर), गर्द अंधार (अंमली पदार्थांच्या दुनियेवर), मिशन अंतरिक्ष (सायन्स फिक्शन) या पुस्तकांचा विशेष उल्लेख करता येईल.
पुष्पाबाई शेवटपर्यंत अथकपणे वाचन करत होत्या. सतत कार्यरत राहणे हा त्यांचा स्वभावगुण होता. हिंदी चित्रपटांतील गाण्यांवर पीएचडी मिळवण्याची इच्छा होती. तसेच एक गंभीर विनोदीपट त्यांना काढायचा होता. या इच्छा मात्र अपूर्ण राहिल्या. मराठी साहित्यक्षेत्र व पत्रकारितेला पुष्पा त्रिलोकेकर यांचं मोठंच योगदान आहे. स्वातंत्र्योत्तर काळाच्या मोठ्या तुकड्यावर पुष्पाबाईंचा अमीट ठसा आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.