सलग दुसऱ्या वर्षी अरबी समुद्रातून आलेल्या चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवर जोरदार धडक दिली. मागच्या वर्षी निसर्ग वादळाने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि काही प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकसान केले होते. तर यावर्षी आलेल्या ताउते वादळाने मुंबईसह, कोकण आणि गुजरात किनारपट्टीलाही तडाखा दिला. हे वादळ आता शमलंय. पण तरी या वादळाच्या नावाचा वाद काही शमला नाही. देवनागिरी भाषेत वादळाचे नाव लिहिताना बराच गोंधळ उडतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वादळाचे नाव लिहित असतो. आताही अनेकांनी Cyclone Tauktae ला तौक्ते, तौते, तौत्के अशा नावांनी संबोधले आहे. खरं नाव काय आहे? चला जाणून घेऊया.
खरंतर Cyclone Tauktae या वादळाचा उच्चार ताउते असा आहे. इंग्रजी नावातील क सायलेण्ट आहे. ताउते हा म्यानमारचा म्हणजे ब्राह्मी भाषेतला शब्द आहे. ताउते हे मान्यमारमधील एका सरड्याच्या प्रजातीचे नाव आहे. अर्थातच यंदा वादळाचे नामकरण म्यानमारने केले आहे, हे तुम्हाला समजले असेल. मागच्या वर्षी आलेल्या निसर्ग वादळाचे नामकरण बांगलादेशने केलेले होते.
#Cyclone '#Tauktae' (pronounced as Tau’Te), a name given by #Myanmar, means highly vocal lizard #GECKO.#TauktaeCyclone #Tauktae #CycloneAlert #Cyclone pic.twitter.com/XOK4WlysBX
— Meteorological Centre, Bhubaneswar (@mcbbsr) May 14, 2021
वादळांच्या नावाचं बारसं कोण करतं?
जागतिक हवामान संघटना, आशिया आणि पॅसिफिक परिसराचा संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग तसेच पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स या संस्थाकडून चक्रीवादळांना नावे दिली जातात. भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना नावे देण्यासाठी भारतासहीत १३ देशांचे पॅनल तयार केलेले आहे. या देशांनी आधीच वादळांच्या नावाची यादी तयार करुन दिलेली आहे.
२००४ साली जेव्हा पहिल्यांदा १३ देशांचे पॅनेल बनविले होते. तेव्हा प्रत्येक देशाने ८ याप्रमाणे ६७ नावे दिली होती. अम्फान हे यादीतील शेवटचे नाव होते. २०१८ साली १३ देशांनी पुन्हा एकदा १३ नावे देऊन सुधारीत १६९ नावांची नवीन यादी तयार केली होती. बांगलादेशाने दिलेल्या निसर्ग या नावाचा समावेश नवीन यादीत होता. हे वादळ मागच्यावर्षी भारतात येऊन गेले. याच यादीतील ताउते हे नवीन नाव आहे.
वादळाच्या नावाचा बहुमान कुणाला मिळतो?
चक्रीवादळाचे नाव लहान आणि सोपे असण्यावर हवामान खात्याचा भर असतो. तसेच या नावामुळे राजकारण, लिंग, प्रदेश आणि संस्कृतीसंदर्भात कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाते. सामान्यपणे पुळे, नद्या, विशेष शब्द आणि प्राण्यांच्या नावावरुन वादळांना नावे दिली जातात.
भारताकडून आतापर्यंत सुचविलेल्या नावांमध्ये अर्णव, निसर्ग, आग, अझर, प्रभंजन तेज, गती, लुलू या नावांचा समावेश आहे. तसेच याआधी अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर आणि वायू अशी आठ नावे देखील भारताने सुचवली होती.