कोरोना लसीच्या मागणीवरुन सध्या केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटलाय. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्रावर गंभीर आरोप केले. राज्याने पाच लाख डोस वाया घालवले असल्याचे जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे काही मंत्री यांनी जावडेकर यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. महाराष्ट्र कोरोना लसीच्या वेस्टेजमध्ये कसा सर्वात मागे आहे, हे आकडेवारीसहीत अनेकांनी दाखवून दिले. देशातील सर्व राज्यांची लस वाया घालवण्याची सरासरी ही ६.५ टक्के असताना महाराष्ट्रात मात्र लसींचे वेस्टेज दोन टक्क्यांच्याही खाली असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
लसीचे वेस्टेज नेमके कसे होते?
कोरोना लसीचे वेस्टेज म्हणजे काय? ते कसे होते? आरोग्य कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे की यंत्रणेतील दोष? याबाबत माहिती मिळवण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रे पक्षाच्या डॉक्टर सेलचे प्रमुख डॉ. नरेंद्र काळे यांच्याशी संपर्क साधला. याबाबत त्यांनी माहिती दिली.
वैद्यकीय परिमाणाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला अर्धा (०.५) मि.ली.ची लस द्यावी लागते. कोव्हॅक्सिनची एक वायल्स (vials) १० मिलीची तर कोव्हिशील्डची वायल्स ५ मिलीची असते. लशीच्या वायल्स २ ते ८ डिग्री सेल्शिअस तापमानात ठेवाव्या लागतात. एकदा वायल्स उघडली की ती चार तासांच्या आत वापरावी लागते.

लसीकरण केंद्र ५ वाजता बंद होतं. शेवटच्या पाच मिनिटांत जर समजा दोन कक्षात दोन पेशंट आले तर दोन वायल्स उघडल्या जातात. अशावेळी कोव्हिशील्डचे ९ मिली. तर कोव्हॅक्सिनचे १९ मिली. डोसेस वाया जातात. कारण लसीकरण केंद्र त्यानंतर बंद होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी उघडतात. एकदा उघडलेली वायल पुन्हा रेफ्रिजरेट करता येत नाही.

कक्षांमध्ये शेवटच्या चार तासांच्या अवधीत किती वायल्स उघडल्या जातायत आणि किती पेशंट्स शिल्लक आहेत याचं गणित मांडून व्यवस्थापन केलं. तर कमीत कमी लशी वाया जातील. पण या वायल व्यवस्थापनाचं काम काही मोठी हॉस्पिटल्स सोडली तर बाकीच्या ठिकाणी होत नाही. त्यामुळेच लशींचा साठा वाया जातो.
महाराष्ट्रात लशींचं नियोजन खूप चांगल्या प्रकारे होत आहे. त्यामुळे लशी वाया जाण्याचं प्रमाण ॲडमिनिस्टर्ड लशींच्या १.६ टक्के इतकं आहे. राष्ट्रीय पातळीवर हा आकडा सुमारे ६.५ टक्के इतका आहे.

लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. https://t.co/8ewkNm216D
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 8, 2021
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात लसीचे वाया जाण्याचे प्रमाण काढण्यासाठी आम्ही राज्याच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता दि. ८ एप्रिल २०२१ ची आकडेवारी आम्हाला मिळाली. ती पुढीलप्रमाणे.
महाराष्ट्र लसीकरण आकडेवारी – ८ एप्रिल २०२१
स्वीकृत साठा- १,०६,२३,५०० डोस
प्रत्यक्ष लसीकरण – ८९,५५,९१८
शिल्लक साठा अंदाजे – १२,२७,००० डोसेस
अपव्यय (वेस्टेज) – १.६ टक्के फक्त
वेस्टेज कसे रोखणार?
कोरोना लसीचे वेस्टेज थांबवायचे असेल तर योग्य नियोजनाशिवाय पर्याय नाही. प्रत्येक लसीकरण केंद्रावर जर लस घेणाऱ्यांची संख्या निश्चित करुन त्यासाठी लागणाऱ्या वायल्स योग्य प्रमाणात वापरल्यास लसीचे वेस्टेज रोखता येईल.