नवीन युगासमवेत नवीन संकल्पना आपल्यात रूजू होत आहेत. तसं ही तारखांची संकल्पना काही इतकी नवी नाही. मात्र त्याला एखाद्या इवेंटची जोड देऊन ती तारिख कायम स्मरणात राहावी या साठी सध्याची पिढी फारच प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. त्यात जर लग्नाची गोष्ट असेल तर इव्हेंटला तोडच नाही. हल्ली तर आधी तारखा पाहिल्या जातात आणि मग मुहूर्त काढला जातो. आज तारिख २२-२-२२ ही लयं स्पेशल आहे बऱ्याच जणांसाठी. त्यामुळे या तारखेचं स्पेशलपणा आणखी वाढवण्यासाठी बरीच जोडपी आज आपलं शुभमंगल लावून घेणार आहेत. ठाण्यातील उपनिबंधक कार्यालयात तर आज ४५ जोडप्यांचा विवाह पार पडणार आहे. त्यासाठी संपूर्ण उपनिबंधक कार्यालय सज्ज झालं आहे. या कार्यालयाला केळीच्या खांबाचे गेट लावण्यात आले आहेत. फुलांचे तोरण बांधण्यात आले असून सनईचे सूर झडताना दिसत आहेत.
२२-२-२२ ही तारीख म्हणजे लग्नाचा पारंपारिक मुहूर्त नाहीये. पण अशी तारीख क्वचितच येते आणि लक्षातही राहते. त्यामुळे विवाहोच्छूक मुलं मुली अशा तारखांना लग्न करण्यावर अधिक भर देत असतात. त्यासाठी वधू-वरांनी गेल्या पंधरा दिवसांपासूनच तयारी केली होती. ठाण्याच्या विवाह कार्यालयात याच तारखेचं लग्नाची नोंदणीही केली आहे. तसेच नातेवाईक आणि मोजक्याच मित्रमंडळींना या लग्नसोहळ्याला येण्याचं आवतनही दिलं आहे. तसेच रिसेप्शनसाठी हॉटेल, छोटे हॉलही बुक केले आहेत.
अशा साधल्या तारख्या
विवाहोच्छुकांनी या पूर्वीही तारखांचा मेळ साधत विवाह सोहळे उरकून घेतले आहेत. ठाण्याच्या निबंधक कार्यालयात ११-११-११ या दिवशी २७ जण लग्नाच्या बेडीत अडकले. तर १२-१२-१२ रोजी ३० जणांनी शुभमंगल उरकून टाकले होते. तर व्हॅलेंटाईनच्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी रोजी ४० जणांनी लग्न केलं होतं. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न करणाऱ्यांची संख्या अधिक असते असंही उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आलं.