आजचे उच्च शिक्षित तरुण नोकरी व्यवसायासाठी परदेशी सेटल होताना दिसतात. नव्या पिढीत शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणे दुर्मीळच झाले आहे. याच पिढीतील एक तरुण मुंबईत लहानचा मोठा होतो. उच्च शिक्षण घेऊन परदेश वारी करुनही त्याला आपल्या गावच्या मातीची ओढ लागते आणि तो शेती विषयक व्यवसाय सुरू करणाच्या उद्देशाने मुंबईहून थेट गावी स्थायिक होतो. हा ध्येय वेडा तरुण म्हणजे सुमीत भोसले. सुमीत भोसले यांनी शेती विषयक व्यवसायाची कोणतेही पार्श्वभूमी नसताना त्यांनी सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यांचा हा व्यवसाय कोकणातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सुमीत यांचे शालेय शिक्षण मुंबईत आय. ई. एस. (न्यू इंग्लिश स्कूल) मधून झाले. रुईया महाविद्यालयातून भौतिकशास्त्र विषयात पदवीधर झाल्यानंतर ऑडिओ इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर सात ते साडेसात वर्ष त्यांनी रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून काम केले. नोकरी निमित्त देश – परदेश भ्रमणही झाले. त्या दरम्यान आपल्या येथे शेती विषयक काहीतरी केले पाहिजे, असे सुमीत यांच्या मनात आले. परंतु मुंबईत शेतीविषयक करणे शक्य नव्हते. सुमीत यांची गावी म्हणजे सावंतवाडीला सात-आठ एकर जागा होती. या जागेचा वापर शेती विषयक व्यवसाय करण्यासाठी करावा, असे मनात आले. पण या जागेत नक्की कोणता व्यवसाय करावा ते समजत नव्हते. कोकणातील शेती ही हंगामी असल्याने त्यातून पूर्णवेळ अर्थाजन होणे शक्य नव्हते. शेतीला पुरक व्यवसाय करावा असे सुमीत यांनी पक्के केले. कोकणाच्या मातीत बंदिस्त शेळीपालनाचा ‘कॅलिफोर्निया ३० गोट फार्म’ अभिनव प्रयोग सुमीत यांनी सुरू केला. गेल्या १० वर्षात हा व्यवसाय यशस्वी भरारी घेत आहे.

शेळीपालनाचा जेव्हा सुमीत यांनी पक्के केले तेव्हा त्यासाठी त्यांनी रीतसर अभ्यास केला. २०१२ पासून त्यांनी १० शेळ्यांपासून या व्यवसायाला सुरुवात केली. शेळीपालनासाठीचे मूळ शिक्षण हे सुमित ह्यांनी बी. व्ही. सी. (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय) परेल यांच्या गोरेगावला आरे कॉलनीमधील लॅबमध्ये झाले. २०१४ पासून सुमीत यांनी नोकरी सोडून कायमचे व्यवसायासाठी सावंतवाडीला स्थायिक झाले. सुरुवातीला धनगराकडून शेळी विकत घेतल्या त्यांचे पालन सुरू केले. परंतु या शेळ्यांना रानात मुक्त संचार करण्याची व चरणाची सवय असल्याने त्यांना बंदिस्त वातावरण मानवले नाही त्यांची वाढ खुंटत असल्याचे सुमीत यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आणखी अभ्यास करुन बंदिस्त शेळीपालनासाठी राजस्थान मधील ‘शिरोई’ जातीच्या शेळ्या आणल्या आणि या शेळ्या सांभाळण्यास सुरुवात केली. बंदिस्त शेळीपालनामध्ये या शेळ्यांची वाढ चांगली होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बंदिस्त शेळीपालनात शेळ्यांना त्यांच्या निवारा जागेत चारा दिला जातो आणि संगोपन केले जाते. विक्रीसाठी लागणाऱ्या शेळ्या या मागणीनुसार आणल्या जातात. आज फार्ममध्ये दोनशे-सव्वा दोनशे प्राणी आहेत. शंभर सव्वाशे प्राण्यांची विक्री दर महिन्याला होते.

शेळीपालनाला पुरक व्यवसाय सुमीत यांनी सुरू केले. आंब्याच्या मोसमात आंब्याची लागवड करुन आंब्याची विक्री होते. शेळीच्या विष्टेपासून खत निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. यासाठी सुद्धा त्यांनी वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करुन खतनिर्मिती केली. या खताला मुंबई, पुणे, बँगलोर या ठिकाणाहून भरपूर मागणी आहे, असे सुमीत यांनी सांगितले. आतापर्यंत शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिले जात नव्हते. आम्ही त्याला व्यवसायाचे स्वरुप दिले. त्याचे मार्केटिंग तंत्र विकसित केले, असे सुमीत सांगतात. शेळ्यांची वाढ होण्यासाठी तिच्या चाऱ्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. हिरवा चारा, सुका चारा आणि खुराक शेळीच्या आहारासाठी लागतात. त्याचे वर्षभरासाठी नियोजन करुन शेळ्यांचे संगोपन केले जाते. शिरोई, उस्मानाबादी, कोकण कण्याळ, कोटा , सोजत, बारबरी, आफ्रिकन अशा शेळीच्या विविध प्रजाती ‘कॅलिफोर्निया ३० गोट फार्म’ मध्ये पाहायला मिळतात.

कोकणामध्ये शेळीपालन होऊ शकत नाही, असा गैरसमज येथील लोकांचा होता. पारंपारिक शेळीपालनासाठी लागणारे वातावरण कोकणात नाही. बंदिस्त शेळीपालनाचा प्रयोग यशस्वी करुन तरुणांना या शेतीपुरक व्यवसायासाठी प्रेरित करणे हा उद्देश सुमीत भोसले यांचा आहे. १ लाख स्वतःच्या भांडवल गुंतवणूकीतून सुरु केलेल्या व्यवसायाची प्रती वर्षाची उलाढाल सुमारे ५०-६० लाखाच्या घरात पोहोचली आहे.

रायगड सोडला तर रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये प्राण्यांचा बाजार भरत नाही. प्राण्यांची खरेदी विक्रीसाठी मोठी बाजारपेठ कोकणात नाही. ती विकसित करणे. कोकणाच्या मातीत पशुपालनाच्या व्यवसायाला चालना देणे, या दृष्टीने सुमीत भोसले यांचे प्रयत्न सुरू आहेत.