हल्ली स्मार्टफोनवर ओटीटी ॲप उपलब्ध होत असल्यामुळे पुर्वीपेक्षा इअरफोन वापण्याचा सरासरी वेळ वाढला आहे. पुर्वी गाणी ऐकण्याकरिता इअरफोन किंवा हेडफोन वापरले जात असत. मात्र आता चित्रपट, वेब सिरीजमुळे तासनतास काही लोक कानात इअरफोन घालून असतात. मात्र सततच्या इअरफोन वापरामुळे कानाला गंभीर आजार होत असून रक्तदाब, नैराश्य आणि चिडचिडेपणा सारख्या इतर मानसिक समस्याही होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
इअरफोन कानाच्या पडद्याजवळ लावल्यामुळे त्यातून निर्माण होणारा ध्वनी आपल्या पडद्यावर आघात करत असतो. जर इअरफोनचा अधिक वापर केला तर कमी ऐकू येणे, बहिरेपण जाणवणे, झोप न येणे, डोके दुखी अशा एक ना अनेक समस्यांनी लोक ग्रस्त आहेत.
आपल्या कानांची क्षमता किती आहे?
ईएनटी विभागातील डॉक्टरांच्या मतानुसार सामान्य व्यक्ती ८५ डेसिबलपर्यंतचा आवाज आठ तासांसाठी किंवा १०० डेसिबलचा आवाज केवळ १५ मिनिटांपुरता सहन करु शकतो. यापेक्षा अधिक डेसिबलचा आवाज सतत कानावर पडत राहिल्यास त्या व्यक्तीला बहिरेपणासारख्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. हेडफोन किंवा इअरफोनवर म्युझिक ऐकणाऱ्या अनेकांना मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याचा छंद असतो. आजूबाजूच्या आवाजाचा व्यत्यय येऊ नये म्हणून अनेकजण मोठ्या आवाजात गाणी ऐकतात. मात्र हा छंद कानाच्या आरोग्यावर बेतू शकतो.
कानांसोबतच मेंदूसाठीही जास्तवेळ इअरफोन वापरणे धोकादायक आहे. इअरफोन किंवा हेडफोनमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी निर्माण होतात. त्यामुळे इअरफोनचा अधिकवेळ वापर केल्यास या लहरींचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कमी वेळासाठी आणि तेही लहान आवाजात इअरफोन वापरणे अधिक सोयीस्कर होऊ शकते.
सतत इअरफोन वापरल्यामुळे कानात मळ वाढण्याची समस्या देखील होते. इअरफोन ठेवण्याची जागा स्वच्छ नसेल तर इअरफोनद्वारे कानात धूळ आणि इतर कचरा जाण्याची शक्यता असते. यामुळे अनेकवेळेला कानात मळ वाढल्याची समस्या किंवा टिटनस सारखी तक्रार उद्भवू शकते.
मर्यादित वापर करा, इअरफोनचा आनंद घ्या
बदलत्या जीवनशैलीत आणि अपडेट राहण्याच्या स्पर्धेत इअरफोन टाळता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे याचा वापर मर्यादीत स्वरुपात केल्यास आपण त्यापासून निर्माण होणाऱ्या धोक्यापासून वाचू शकतो.
१) खूप जास्त काळासाठी इअरफोन किंवा हेडफोन वापरू नयेत.
२) वारल्यास त्याचा आवाज लहान ठेवावा.
३) आपले इअरफोन इतरांसोबत शेअर करु नका
४) इअरफोन कानांच्या एकदम आत घालण्याचा प्रयत्न करु नका.
५) इअरफोन किंवा हेडफोन विकत घेताना चांगल्या कंपन्यांचे घ्यावेत. जेणेकरुन आवाजाचा चांगला दर्जा मिळेल.