देश घडविण्यासाठी देशातील युवकांना घडविण्याची गरज असते. आपल्या देशात अनेक होतकरु युवक स्वबळावर उंच उडी मारण्याच्या प्रयत्न करत असतात. मात्र यासाठी केवळ उत्साह कामाचा नाही, तर आपली नेमकी जबाबदारी काय, आपण यश कसे गाठू शकू, यशामध्ये नेमक्या अडचणी कोणत्या? याचा सविस्तर विचार करणे गरजेचे असते. नुकतेच यवतमाळ जिल्ह्यातील एक युवा संशोधकाचा मृत्यू झाला. मारुती ८०० गाडीचं इंजिन वापरुन हेलिकॉप्टर बनविण्याच्या स्वप्नानेच त्याचा बळी घेतला. ही घटन दुःखद आहेच. आजच्या आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांनी ‘जोश के साथ होश भी’ कसा राखावा? या प्रश्नाबाबत चर्चा करुयात.
बालपणापासून अनेक कल्पनांच्या विश्वातून जेव्हा कर्तुत्वाच्या विश्वात आपण येतो, तेव्हा प्रत्येकालाच आपली स्वप्न साध्य करण्याची ओढ लागते. मात्र हे करताना योग्य अभ्यास, दृष्टीकोन तसेच अनुभवी माणसांचा सल्ला घेणे गरजेचे असते. या सर्व घटकांअभावी प्रयत्न करताना बऱ्याचवेळा अपयश हाती येते. काल यवतमाळ येथील एका होतकरू युवकाने अशाच प्रयत्नात आपले प्राण गमावले. त्यामुळे आपल्या कामाची सुनियोजित पद्धत कशी असावी याचा हा आराखडा.
प्रकल्पाची प्राथमिक माहिती मिळवणे
जो विचार आपल्या डोक्यात घर करुन बसला आहे, त्याला सत्यात उतरवण्यासाठी पहिल्या दिवसापासून त्याची प्राथमिक माहीती गोळा करायला सुरुवात करा. यासाठी वाचन वाढवणे गरजेचे आहे. माहीतीला योग्य स्वरुप येण्यासाठी त्या गोष्टीचा इतिहास जाणून घ्यायला मदत होते. त्यातून अनेक पैलू आपल्याला मिळू शकतात. यातून नेकम काय करावे? याचे योग्य नियोजन पुढे करता येऊ शकते.
प्राथमिक माहीतीमधील मर्म काढणे
आपल्या वाचनातून केलेल्या संशोधनाला कृतीत उतरवण्यासाठी अचूक माहितीचा संच करणे गरजेचे असते. त्यासाठी प्रकल्पामागचे खाचखळगे अनुभवी व्यक्तीच्या माध्यमातून समजणे गरजेचे आहे. याचा फायदा कोणत्याही गोष्टीत अडथळा न येता काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते.
संकटाची दाहकता ओळखावी
नवी गोष्ट म्हटली की त्यात संकट हा शब्द ठळक अक्षरात दिसून येतो. या संकटाची चहूबाजूंनी होणारी दाहकता जाणून घ्यावे. ज्यामध्ये कायदेशीर, तांत्रिक, सामाजिक अशा मुद्यांचा विचार करावा. त्याप्रमाणे आपल्या कृतीचा आराखडा तयार करावा. यात आर्थिक तसेच मानसिक नुकसानीचा मोठा फटका वाचवता येऊ शकतो.
प्रकल्पाला कृतीत कसे आणावे
संपूर्ण माहीती मिळाल्यानंतरच प्रकल्पाची सुरुवात करावी. सुरुवातीला पूर्ण जोमाने काम करण्याऐवजी आपली क्षमता ओळखून काही कालावधीने त्याला गती द्यावी. या गोष्टीने आपले ध्येय गाठण्यासाठी लागणारा कालावधी निश्चित करण्यास मदत होईल.
सर सलामत, तो पगडी पचास
शेवटचं आणि महत्त्वाचं. आपले ध्येय गाठत असताना इतकही वाहून जाऊ नये की आपल्या शरीरिला किंवा कुटुंबातील सदस्यांना हानी पोहोचेल. शेवटी आपण जगलो, कुटुंब जगले तरच आपल्या मेहनतीचे फळ चाखले जाईल. त्यामुळे सेफ्टीला सर्वात टॉप प्रायोरिटी दिली पाहीजे. यवतमाळच्या इस्माइल शेखने हेलिकॉप्टरचे प्रयोग करण्यासाठी दिवस उजेडाची वेळ निवडली असती. हेल्मेट, दरवाजा आणि सिट बेल्ट बांधण्यासारखे काही उपाय योजिले असते तर तो पंखा लागून त्याचा मृत्यू ओढवला नसता.
“सर सलामत, तो पगडी पचास” या युक्तीप्रमाणे आपले ध्येय गाठताना काळजी घ्या.
आपल्या ध्येयाला यशस्वीरित्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी वरील सर्व बाबी नक्कीच उपयोगात येऊ शकतील. याचा होतकरू युवकांना नक्की फायदा होईल.