गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फेसबुक (Facebook) नाव बदलण्यात आले, त्यानंतर ही कंपनी आता मेटा (Meta) या नावाने ओळखली जात आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी म्हटले आहे की जगाला त्यांची कंपनी फेसबुक ही सोशल मीडिया कंपनी म्हणून नव्हे तर मेटाव्हर्स (Metaverse) म्हणून ओळखली जावी. परंतु जगाला कंपनीचे नवीन नाव रुचलेलं दिसत नाही. नव्या नावानंतरही वादाने कंपनीची पाठ सोडलेली नाही. मेटाने एका निवेदनात म्हटले आहे की जर युरोपियन युजर्सचा डेटा इतर देशांसोबत शेअर करण्याची परवानगी मिळाली नाही तर त्यांना त्यांची सेवा बंद करावी लागेल. मेटाने म्हटले आहे की युजर्सचा डेटा शेअर न केल्यामुळे त्यांच्या सेवांवर परिणाम होत आहे. युजर्स डेटाच्या आधारे कंपनी वापरकर्त्यांना जाहिराती दाखवते.
मेटाने २०२२ च्या नवीन अटी स्वीकारणार असल्याचे आपल्या अहवालात स्पष्टपणे सांगितले आहे, परंतु जर डेटा ट्रान्सफर सुविधा उपलब्ध नसेल तर फेसबुक, इन्स्टाग्रामसह अनेक सेवा बंद कराव्या लागतील. आत्तापर्यंत मेटा ही कंपनी अमेरिकेतल्या सर्व्हरवर युरोपातील युजर्सचा डेटा साठवून ठेवत होती. परंतु नव्याने जाहीर अटींमध्ये डेटा शेअर करणे अनिर्वाय असेल.
नाहीतर युरोपात सेवा बंद होणार…
मेटाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला कळवले आहे की, शक्य तितक्या लवकर सर्व्हिससाठी नवीन फ्रेमवर्क विकसित न केल्यास युरोपमधील युजर्ससाठी त्यांची सेवा बंद करावी लागेल. युरोपियन युनियच्या कायद्यानुसार, युजर्स डेटा अमेरिकेत असू नये तर META कंपनी युजर्सचा डेटा शेअर करण्याची परवानगी मागत आहे. झुकरबर्गला युरोपमधील युजर्सचा डेटा अमेरिकन सर्व्हरसाठी साठवून ठेवायचा आहे.
यापूर्वीही प्रायव्हसी शिल्ड (Privacy Shield) कायद्यांतर्गत युरोपियन डेटा यूएस सर्व्हरवर हस्तांतरित केला जात होता, परंतु जुलै २०२० मध्ये युरोपियन न्यायालयाने हा कायदा रद्द केला होता. प्रायव्हसी शिल्ड व्यतिरिक्त, मेटा यूएस सर्व्हरवर युरोपियन युजर्सचा डेटा स्टोर करण्यासाठी Standard Contractual Clauses कराराच्या कलमांचा देखील वापर करत आहे, परंतु युरोपासह अनेक देशांमध्ये याची देखील चौकशी सुरू आहे.
मेटा भारतातली फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा थांबवणार?
मेटाकडून केवळ युरोपातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद करण्याविषयीचं विधान समोर आलं आहे. त्यामुळे जरी डेटा शेअरिंग प्रकरणावरुन कंपनी आणि तिथल्या प्रशासनाचं बिनसलं तरी फेसबुक आणि इन्स्टाग्राम केवळ युरोपात बंद होऊ शकतं. कंपनीच्या भारतातील सेवेवर त्याचा काही परिणाम होणार नाही. मात्र भारतीय युजर्सच्या डेटाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो आणि कंपनीला त्यावर उत्तर द्यावं लागेल.