Home लाईफस्टाईल भंगारातून बनवली ‘मिनी फोर्ड’, द ग्रेट इंडियन जुगाड!

भंगारातून बनवली ‘मिनी फोर्ड’, द ग्रेट इंडियन जुगाड!

215
0

सांगलीचे मेकॅनिक अशोक आवटी यांनी M80 दुचाकीचं इंजिन आणि भंगारातलं साहित्य वापरून तयार केलेली जुन्या लूकची नवी गाडी सांगलीत अनेकांचं लक्ष वेधून घेतेय. प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आवटी यांनी या जुगाड मिनी फोर्ड गाडीची निर्मिती केली आहे.

शेतात सुरू केलं गॅरेज

आवटी यांनी अवघ्या ३० हजार रूपयात ‘जुगाड’ करत १९३० सालाच्या गाडीचं हुबेहूब मॉडेल बनवलं. आवटी यांचं सांगली शहरातल्या काकानगरमध्ये ट्रॅक्टर आणि दुचाकी रिपेअरिंगचे एक छोटं गॅरेज आहे. पत्नी, दोन मुलं आणि मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. फक्त गॅरेजमधून मिळणाऱ्या पैशावरच त्यांच्या संसाराचा गाडा चालतो. १० वर्षांपूर्वी आपल्या शेतातल्या जागेत व्यवसाय सुरू करण्याआधी त्यांना विजेचं कनेक्शन हवं होतं. पण वीज वितरण कंपनीला ते कनेक्शन परवडणारं नव्हतं. तेव्हा आवटी यांनी स्वत:च वीज निर्मिती करता येईल का याची चाचपणी सुरू केली. त्यांनी दुचाकी इंजिनचा वापर करून एक पवनचक्की तयार केली. पण तो जुगाड तात्पुरताच होता. आज आवटी यांच्याकडे विजेचं कनेक्शन आहे आणि सगळी कामं त्यावरच होतात.

युट्यूब पाहून शिकले गाडी बनवायला…

२०२० मध्ये लॉकडाऊन लागलं आणि आवटी नव्या आयडियाच्या मागे लागले. घरबसल्या युट्यूबवर ते गाड्यांचे व्हीडिओ पाहायचे.

परदेशात दुचाकी इंजिनापासून छोट्या चारचाकी गाड्या तयार केल्याचे व्हीडिओ त्यांनी पाहिले आणि त्यांना आपणही अशी गाडी तयार करू शकतो अशी कल्पना सुचली.

युट्यूबवरच त्यांनी 1930 सालची ‘मिनी फोर्ड’ गाडी पाहिली आणि याच पद्धतीची गाडी बनवण्याचा निश्चय केला.

“1930 सालची फोर्ड गाडी ही कोळसा,आणि डिझेलवर चालत असे. ही गाडी दिसायला रूबाबदार वाटते. आजच्या जमान्यात ही गाडी पाहायला मिळावी म्हणून मी ही गाडी फावल्या वेळात बनवायला सुरूवात केली. त्यासाठी एम-80 दुचाकी इंजिन, रिक्षाचे पार्ट आणि भंगारातलं साहित्य उपयोगाला आलं.”

“पहिल्यांदा गाडीचा ढाचा बनवला. मग भंगारातून पत्रा, लोखंड असं साहित्य गोळा केलं. त्याला वेल्डिंग असेल तर इतर गोष्टींच्या माध्यमातून हुबेहूब फोर्ड प्रमाणे लूक देण्याचा प्रयत्न केला. काही वेळा चुका होत होत्या, मग पुन्हा सुधारणा करत त्याला आकार आला. मग दोन वर्षांत मेहनतीने हुबेहुब 1930 सालच्या फोर्ड गाडीसारखी दिसणारी गाडी तयार झाली.”

ताशी ५० किलोमीटरचा वेग

आवटी यांच्या या जुगाड गाडीत चार जण बसू शकतात. गाडीला तीन गियर तर स्टार्ट करण्यासाठी रिक्षेसारखं हँडल किक आहे. शिवाय रिव्हर्स घेण्यासाठी रिक्षाच्या गिअर बॉक्सचा वापर करत वेगळं गिअर बॉक्स बनवलंय.
ही जुगाड गाडी प्रति लीटर 30 किलोमीटर इतकं मायलेज देते आणि ताशी 50 किलोमीटर वेगाने धावू शकते असा आवटी यांचा दावा आहे. बॅटरी, हेडलाईट, इंडिकेटर हे देखील जोडतोड करत बनवलं गेलंय. मोटर वाहन नियमानुसार अशा गाड्यांना परवानगी देता येत नाही. यावर आवटी म्हणतात, “पेट्रोलचे भाव भडकल्याने सामान्य कुटुंबांना परवडतील अशी ही गाडी आहे. त्यामुळे अशा गाड्यांना परवानगी मिळाली पाहिजे.”

‘हौसेला मोल नाही’

विंटेज, जुन्या लुकची गाडी असल्याने अनेकांना ही हौसेखातर हवीहवीशी वाटते असंही ते म्हणतात.

“सुट्टीच्या दिवशी रस्त्यावरून आपल्या मुलांना घेऊन फेरफटका मारला तरी फिरल्यासारखं वाटतं. आपल्याला ही वाटतं स्वतःची गाडी असावी. मुलांचीही हौस असते. शिवाय अशा गाड्या आता पाहायला मिळत नाहीत, त्यामुळे लोकांना या गाड्या बघून आनंद मिळतो”

जुगाड फोर्ड गाडीच्या निर्मितीनंतर अशोक आवटे यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फोन येत असतात. कोणी त्यांची गाडी विकत मागत असतं तर कोणी गाडी बनवून मागतं.

Previous articleहिंदुस्थानी भाऊ पहिली फुरसतमध्ये घरी, भाऊच्या सशर्त जामीनाला कोर्टाची मंजुरी
Next articleJob Alert : भारतीय नौदलात १५३१ जागांवर भरती, ६३ हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here