कोरोनाची तिसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र आता महाराष्ट्रातील काही भागांमध्ये थंडीची लाट येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. राज्यातील बहुतांश भागातील कमाल तापमान २५ अंशाखाली नोंदवण्यात आले. येत्या ३८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात थंडीची लाट येणार असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच काही भागात शीत दिनाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली.
राज्यातील अनेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक ठिकाणी शेकोटी पेटवल्याचे चित्र दिसले. मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. मुंबईकरांनी दिवसभर स्वेटर, मफलर, शाल पांघरूण बाहेर पडताना दिसत आहे. तर घरातील पंखे बंद केले आहेत. मंगळवारी नाशिक ६.३, पुणे ८.५, जळगाव ८.६, मालेगाव ८.८, मराठवाडा ८.८, माथेरान १०.०, डहाणू १३.९, कुलाबा १५.२ सांताक्रुझ १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. मुंबई, डहाणू, अलिबाग आणि मालेगावमध्ये गेल्या दहा वर्षांतील जानेवारी महिन्यातले सर्वात निच्चांकी कमाल तापमान नोंदवले गेले.
गेल्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात तापमानात घट झालेली आहे. पुढील ३८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शीत दिन म्हणजे काय?
किमान तापमान १० पेक्षा कमी आणि कमाल तापमानात चार अंश सेल्सिअस घसरण होते त्याला शीत दिन म्हटले जाते.
सोमवारी कमाल तापमानात झालेली घट
सांताक्रूझ – २४.८ अंश सेल्सिअस
कुलाबा -२४.६ अंश सेल्सिअस
डहाणू – २२.५ अंश सेल्सिअस
मालेगाव – २० अंश सेल्सिअस
अलिबाग – २४ अंश सेल्सिअस
माथेरान – २० अंश सेल्सिअस
नाशिक- २३.९ अंश सेल्सिअस