काल ४ मार्च रोजी ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न यांचं थायलंडमधल्या कोह समुईमध्ये निधन झालंय. त्याच्या निधनामुळे जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेन वॉर्न यांच्या निधनाबद्दल सांगणाऱ्या निवेदनात म्हटलंय, “शेन त्यांच्या बंगल्यात बेशुद्ध आढळले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना शुद्धीवर आणता आलं नाही. या कठीण काळामध्ये कुटुंबाने आपल्याला काही खासगी क्षण मिळावेत अशी विनंती केली आहे. याबद्दलची अधिक माहिती आम्ही काही वेळाने देऊ “
शेन वॉर्नच्या निधनानंतर आता जगभरात ह्रदयविकाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे…
हार्ट अटॅक येतो कसा?
हार्ट अटॅकचं प्रमुख लक्षण म्हणजे छातीत दुखणं. आपल्या चित्रपटांमध्ये हार्ट अॅटॅक म्हटलं की काही दृश्यं हमखास दाखवली जातात. छातीत दुखणारा माणूस हात हृदयाशी घेऊन पिळवटतो. वेदनेमुळे त्याच्या डोळ्यात भीती दिसते. दुखणं हाताबाहेर गेल्याने तो जमिनीवर पडतो. मात्र चित्रपटात दाखवलं जाणारं हे दृश्य प्रत्यक्षात नेहमीच तसं नसतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा होत नाही तेव्हा हार्ट अटॅक येतो. साधारणत: धमन्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला की हृदयाला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो. या कारणामुळे छातीत प्रचंड दुखतं. मात्र काही वेळेला छातीत दुखत नाही. त्याला “सायलेंट हार्ट अटॅक” म्हटलं जातं.
Healthdata.org या वेबसाईटनुसार जगभरातही हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. २०१६ वर्षात विविध कारणांनी होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास करण्यात आला. यापैकी ५३ टक्के लोकांनी हार्ट अटॅकमुळे जीव गमावला.
हार्ट अटॅकची लक्षणं?
छातीत दुखतं, अस्वस्थ वाटतं
छातीतून हात, जबडा, मान, पाठ, पोट यासारखे अवयव दुखणं
मन अस्वस्थ होतं
चक्कर येते
प्रचंड घाम येतो
श्वास घेण्यात अडचण
उलटीसारखं वाटणं
खोकल्याची मोठी उबळ येणे.
जोराजोरात श्वास घ्यावा लागणे.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि डायबेटिस असणाऱ्यांना छातीत प्रचंड दुखत नाही. मात्र तरीही तो हार्ट अटॅक असू शकतो.
अचानक हार्ट अटॅक येण्याची कारणं?
बी-12 शरीरामध्ये कमी प्रमाणात असेल तर, रक्ताची गाठ तयार होते. रक्त घट्ट होण्याची शक्यता असते. ही गाठ हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गेल्यास हार्ट अटॅक येतो. असं झाल्यास कार्डिएक अरेस्टने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते.”
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काहीवेळा अचानक तयार झालेली रक्ताची गाठ डोक्यात जाते. पण, यात रुग्णाला अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते.
काही रुग्णांना त्यांना हृदयाचा आजार आहे याची माहितीसुद्धा नसते. अशावेळी हृदयावर जास्त प्रेशर आल्याने हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते,
हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी काय करावं?
युवा वर्गाने आपल्या जीवनशैलीत थोडी शिस्त आणणं आवश्यक आहे. योगसाधना केल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. योग केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. मन एकाग्र होण्यास फायदा होतो, असंही डॉक्टर सांगतात.
हार्ट अटॅकपासून वाचायचं असेल तर ट्रान्स फॅट्सना दूर ठेवा
तंबाखू आणि सिगरेटवर सरकारने कर बसवला आहे. तसंच जंक फूडच्या बाबतीत हवं. जंक फूडच्या पॅकेटवरही सिगारेटच्या पाकीटावर असतो तसा ठळक अक्षरात इशारा लिहायला हवा. हे केल्याने लगेच हार्ट अटॅकचं प्रमाण घटणार नाही पण जागरुकता वाढेल.
हार्ट अटॅक आल्यानंतर CPR का महत्त्वाचा आहे?
हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीचं हृदय अचानक बंद पडतं आणि तो व्यक्ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो. अशा व्यक्तीला योग्य वेळी CPR दिल्यास जीव वाचू शकतो.
टीव्ही किंवा सोशल मीडियावर तुम्ही अनेक दृष्य पाहिली असतील. ज्यामध्ये हार्ट अटॅकमुळे अचानक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हातांच्या मदतीने लोक दबाव देतात. या प्रक्रियाला कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन अर्थात CPR असं म्हटलं जातं.
हृदयरोगतज्ज्ञ म्हणतात, हार्ट अटॅकचे ५० टक्के मृत्यू रुग्णालयात वेळेवर न पोहोचल्याने होतात. त्यामुळे कार्डिएक अरेस्ट आलेल्या रुग्णांसाठी CPR अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कार्डिएक अरेस्ट आलेल्या रुग्णाला CPR वेळेत दिला गेला. तर, लोकांचे प्राण वाचवणं शक्य आहे. रुग्णाला रुग्णालयात हलवताना CPR देण्यात आला पाहिजे.