मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यांची अत्यंत दुरवस्था पाहण्यास मिळते. मुंबईतील अनेक किल्ले ही प्रेमी युगलांचा अड्डा बनलेला आहे. तर अवैध्यरित्या किल्ल्यावर फोटोग्राफी सुरू असते. त्यामुळे या किल्ल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. किल्ल्यांच्या भींतीची पडझड झालेली आहे तर बुरूज ढासळलेले आहे. इतिहासाची साक्ष देणारे हे किल्ले खंगत चालले आहे. मुंबई आणि उपनगरातील सहा किल्ल्यांचे संवर्धन व जतन आता पुरातत्त्व संचालनालय आणि इतर बाह्यस्रोताद्वारे करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आलेला आहे. यामध्ये सेंट जॉर्ज, शिवडी, वरळी, माहिम, धारावी, आणि वांद्रे या सहा किल्ल्यांचा समावेश आहे.
नुकतीच सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील किल्ल्यांच्या विकासासंदर्भात ऑनलाईन बैठक पार पडली. हे सहा किल्ले राज्य पुरातत्त्व संचालनालयाच्या अखत्यारित आहे. यावेळी या सहा किल्ल्यांच्या विकासाबाबतचा सविस्तर आराखडा यापूर्वी तयार करण्यात आला असून हा आराखडा शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
यापूर्वी किल्ल्यांच्या संवर्धनासाठी किल्ले दत्तक योजना यांसारख्या योजना राबवण्यात आल्या आहेत. शिवडी किल्ल्यावर मुंबई महानगरपालिकेने २०१९ मध्ये विद्युत रोषणाई केली होती. शिवडीच्या किल्ला सामसुम असतो. जवळच्या गल्लीतील चार टवाळकी मुले सोडली तर या ठिकाणी कोणी फिरकत नाही. वांद्रे किल्ल्यावर प्री-वेडिंग, मॉडेलिंग शूट केले जाते. वरळी किल्ल्यावर अनधिकृत चित्रीकरण केले जाते. माहीमच्या किल्ल्यावर स्थानिकांनी अतिक्रमण केले आहे. अशी दयनीय अवस्थेत मुंबईतील किल्ले आहेत. त्यामुळे किल्ले संवर्धन करणाऱ्या सामाजिक संस्थाकडून सातत्याने किल्ल्यांच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली जात होती. मागील वर्षी धारावीचा काळा किल्लाच्या दुरूस्तीसाठी ८० लाख मंजूर करण्यात आले होते. परंतु कोरोना संक्रमणामुळे किल्ले संवर्धनाचे काम धीम्यागतीने सुरू आहे. परंतु आता राज्य सरकारने मुंबईतील किल्ले संरक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दुर्गप्रेमींसाठी आनंदाची बाब आहे.
मुंबई आणि मुंबई उपनगरातील सहा किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन पुरातत्व संचालनालयामार्फत करण्यात येणार असून या कामासाठी बाह्यस्त्रोतांची मदत घेण्यात येणार आहे. सहा किल्ले मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हयातले असल्याने या जतन आणि संवर्धन कामामध्ये सांस्कृतिक कार्य विभागाबरोबरच दोन्ही जिल्हयांचे जिल्हाधिकारी, पर्यटन विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे या कामासाठी पुरात्तव संचालकांनी पुढाकार घेऊन समन्वयासाठी एक समिती स्थापन करुन या संदर्भातील कामाचे नियोजन करावे. पुरातत्व संचालक यांनी किल्ले विकासाबाबतच्या आराखडयामध्ये जिल्हा नियोजन विकास समितीकडून किती निधी मिळेल, पर्यटन विभागाकडून याबाबत काय करण्यात येणार आहे याची माहितीही घ्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी बैठकीत दिले.