तुम्ही रोज जॉगिंगला जात असाल तर गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला एक फरक नक्की दिसला असेल. पूर्वी सकाळी माणसं फक्त चालायला किंवा धावायला जायची पण आता या गटासोबत सायकल घेऊन बाहेर पडणारे देखील दिसू लागले आहेत. अगदी पद्धतशीर हेल्मेट, नी गार्ड व एल्बो गार्ड घालून हे सायकलपटू अगदी रूबाबात सायकलवरून अख्ख शहर पिंजून काढतात. सायकलिंगचं फॅड सध्या वाढलं आहे याचा अजून एक पुरावा म्हणजे सोशल मीडियावर अपलोड होणारे सायकलिंग करतानाचे फोटो वा स्क्रीनशॉट्स ज्यामध्ये आपण आज किती सायकल चालवली ते दिसतं.
आज 3 जून “जागतिक सायकल दिन”. एप्रिल 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रातर्फे 3 जून रोजी वर्ल्ड बायसिकल डे अर्थात जागतिक सायकल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तेव्हापासून जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे सायकल मुळे पर्यावरणाला आणि आरोग्याला होणारे फायदे याबद्दल जागरूकता पसरवणे आणि अधिकाधिक लोकांना सायकल वापराबाबत प्रोत्साहित करणे.
सायकलस्वारांच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न अजूनही अनुत्तरित!
सायकलस्वारांच्या या समूहात तुम्हाला एक गट असाही आढळतो जो अगदी लांब पल्ल्याच्या सायकलिंग ट्रेक मध्ये सहभागी होतो. काश्मीर ते कन्याकुमारी, दिल्ली ते चेन्नई, मुंबई-दिल्ली-कोलकाता-चेन्नई असे विविध लांबपल्ल्याचे सायकलिंग ट्रेक पूर्ण केलेल्या सायकलिंगपटूंच्या कथा आपण प्रसारमाध्यमातून पाहिल्याही असतील. मात्र भारतात लांबपल्ल्याची सायकलिंग खरच सुरक्षित आहे का? हा एक फार मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. कारण त्यासाठी हव्या असणाऱ्या पायाभूत सुविधा आपल्याकडे शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे सायकलस्वारांच्या अपघातांचे प्रमाणदेखील आपल्या देशात जास्त आहे. स्टॅटिस्टा.कॉम या वेबसाईटच्या अहवालानुसार एकटया दिल्ली शहरात गेल्या पंधरा वर्षांमध्ये एकूण 1664 सायकलस्वारांचा मृत्यू झाला आहे.
युरोपात सायकलिंगसाठी असलेल्या सुविधा
युरोप खंडातील प्रत्येक देशात सायकलस्वारांना प्राधान्य देऊन एका विशिष्ट सायकलिंग ट्रॅकची निर्मिती ही फार पूर्वीपासूनच करण्यात आली आहे. “युरोवेलो” नावाने हे सायकलिंग ट्रॅकचे जाळे ओळखले जाते. नोव्हेंबर 2019 पर्यंत संपूर्ण युरोप खंडात एकूण 45,000 किलोमीटरचे “युरोवेलो” बांधण्यात आलेले आहे. इतर वाहनांचा त्रास न होता प्रत्येक सायकलपटू तेथे अगदी सुरक्षितरित्या सायकल चालवू शकतो आणि अपघाताचेही प्रमाण अगदी नाममात्र राहते. अशा वैशिष्टयपूर्ण सुविधेमुळे युरोपात सायकल खरेदीसाठी लोकांची खूप मागणी असते. स्पेन मधील मालार्का नावाच्या शहरात “युरोवेलो”द्वारे करण्यात येणारी सायकलिंग खूप प्रसिद्ध आहे.
सायकलिंग ट्रॅकला आपल्याकडे मिळणारा अल्प प्रतिसाद
युरोपच्या धर्तीवर आपल्याकडेही काही ठिकाणी सायकलिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात आली. पुण्यात या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला आणि अजूनही मिळतोय. मात्र इतर ठिकाणी सायकलिंग ट्रॅकला फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला दिसला नाही. मुंबईतील बी.के.सी. व्यावसायिक संकुल परिसरातही 2011 साली 6 कोटी रूपये खर्च करून सायकलिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात आली होती. मात्र अल्पप्रतिसादामुळे 2019 मध्ये सदर सायकलिंग ट्रॅक हे पूर्णत: बंद झाले.
नवीन तंत्रज्ञान व पाँईट टू पाँईट सायकल रेंट योजना
सध्या बाजारात बॅटरीवर चालणाऱ्या सायकललासुद्धा फार मोठी मागणी असल्याचे दिसते. साधारणत: 12 हजार ते 16 हजार पर्यंत या सायकल्सची किंमत असते. सदर सायकलमधील बॅटरी ही आपण मारत असलेल्या पॅडलद्वारे निर्माण होणाऱ्या कायनॅटिक एनर्जीद्वारे चार्ज होते. समजा एखादयावेळेस उभ्या चढणीवर आपल्याला सायकल चालवायची असेल तर आपण या सायकलवर विना पॅडल मारताही ती चढण पूर्ण करू शकतो.
त्याचबरोबर तुम्हाला सायकल घेणे परवडत नसेल तर तुम्ही पाँईट टू पाँईट सायकल रेंट योजना द्वारे सायकल भाडयाने घेऊन देखील प्रवास करू शकता. लहानपणी बऱ्याचजणांनी एक दोन रूपये देऊन भाडयाने सायकल नक्कीच घेतली असेल अगदी त्याचप्रकारे तुम्ही पाँईट टू पाँईट सायकल रेंट योजनेद्वारे त्याचे ठराविक शुल्क भरून सायकल भाडयाने घेऊ शकता. सध्या ठाणे परिसरात ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू आहे.
एकंदरीतच आपल्या देशात सायकलस्वारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवणं गरजेच आहे. ज्यावेळेस आपल्या कडे होणाऱ्या सायकलस्वारांच्या अपघाताचे प्रमाण पूर्णत: घटेल तेव्हा कुठे जाऊन दरवर्षी येणारा “जागतिक सायकल दिन” हा दिमाखात आणि स्वाभिमानाने साजरा करू.
तुम्हाला काय वाटतं?