जगभरात आज ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा केला जात आहे. कर्करोग हा गंभीर रोग आहे आणि यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. कर्करोगाबाबत जनजागरूकता व्हावी आणि या रोगाचे प्रमाण कमी व्हावं असं या दिवसामागचं उद्दिष्ट आहे.
कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाच्यामागे आपलं विस्कळीत राहणीमान जबाबदार असतं. या रोगाच्या लक्षणाला दुर्लक्ष केलं तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. कर्करोगाच्या बचावासाठी योग्य आहार आणि योग्य व्यायाम गरजेचा आहे. काही विशेष गोष्टींवर लक्ष देऊन या रोगापासून वाचता येऊ शकते.
तंबाखू व धुम्रपानापासून दूर रहा – कोणत्याही प्रकारचा तंबाखू कर्करोगाच्या धोक्याला वाढवतो. धुम्रपानामुळे फुफ्फुस, तोंड, घसा, स्वादुपिंड, मूत्राशय, गर्भाशय आणि किडनीचा कर्करोग होण्याची संभाव्यता खूप जास्त असते. त्यामुळे तंबाखू व धुम्रपानापासून दूर रहा.
सुयोग्य आहार – हाय कॅलरीवाले जेवण, रिफाईंड केलेली साखर आणि अतिरिक्त फॅटसचे सेवन करण्यापासून वाचा. प्रक्रिया केलेले मांस कमी खा आणि अल्कोहोलचे प्रमाण नाममात्र ठेवा. आपले वजन प्रमाणात ठेवण्यासाठी व्यायाम करा. आपल्या आहारात खूप साऱ्या फळं, भाज्या आणि धान्य समाविष्ट करा. नियोजित आहार घेणाऱ्या नागरिकांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण फार कमी असते.
कार्यशील रहा – संतुलित वजन बनवून ठेवण्याऱ्या लोकांमध्ये फुफ्फुस आणि किडनीच्या कर्करोगाचा धोका फार कमी असतो. त्यामुळे तुम्हाला शारिरिकदृष्ट्या संतुलित राहाव लागेल. शास्त्रज्ञांच्या मते आठवड्यात किमान १५० मिनिटे काहीतरी हालचाल करणे आवश्यक आहे. दरदिवशी किमान ३० मिनिटे काहीतरी व्यायाम केला पाहिजे.
प्रखर सूर्यकिरणापासून स्वत:चा बचाव करा – त्वचेचा कर्करोग हा देखील कर्करोगाचा एक प्रकार आहे. यापासून बचाव करण्यासाठी दुपारी प्रखर उन्हात बाहेर जाऊ नये. दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उन्हापासून वाचण्याचा प्रयत्न करा, कारण या वेळेत सूर्यकिरणे खूप प्रखर असतात. शक्य तेवढं सावलीत राहण्याचा प्रयत्न करा.
वाईट सवयींपासून दूर रहा – कर्करोगापासून वाचण्यासाठी स्वत:ला वाईट सवयींपासून दूर रहा. असुरक्षित यौन संबंधांपासून दूर रहा. एकापेक्षा अधिक लोकांसोबत शरीरसंबंध ठेवू नये, यामुळे STD (सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिज) रोग होण्याचा धोका होतो. एचआयव्हीच्या रूग्णांना लिव्हर आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचेही प्रमाण खूप आहे.
नियमित डॉक्टर चेकअप करा – कर्करोगाचे निदान जितकं लवकरात लवकर होईल तितक त्यावर उपचार करण्यासाठी मदत होते. यामुळे नियमित डॉक्टर चेकअप करा. आपल्या डॉक्टरशी संपर्कात रहा आणि कर्करोग स्क्रिनिंग शेड्यूलची पूर्ण माहिती घ्या.