बिग बॉस या रिअलिटी शोमुळे प्रकाश झोतात आलेला अभिजीत बिचुकलेने पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. यावेळी पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांना बिचुकले आव्हान देणार आहे. आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भारण्याचा शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांच्या पाठोपाठ बिचुकले यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरून दोन्ही उमेदवारांना टक्कर देण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. काही महिन्यांपुर्वी झालेल्या पश्चिम महाराष्ट्र पदवीधर निवडणुकीतही बिचुकले निवडणुकीसाठी उभे राहिले होते, मात्र त्यांचे नाव मतदार यादीतून गहाळ झाल्यामुळे त्यांना स्वतःलाच मतदान करता आले नव्हते.
अभिजीत बिचुकले हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी राज्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी दाखल करत असतात, असा त्यांचा पुर्वइतिहास आहे. राज्यात २०१९ सालच्या निवडणुकीनंतर बिचुकले यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पत्र लिहून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीला शिवसेना उमेदवार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारांचा अर्ज भरला होता. त्यामुळे त्यांची संपूर्ण राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघात दोन्ही उमेदवारांना आव्हान दिले आहे.
बिचुकले यांनी अनेक निवडणूका लढल्या आहेत. यापूर्वी त्यांनी सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीत सुद्धा छत्रपती उद्यनराजे भोसले आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. फक्त लोकांना आकर्षित करण्यासाठी बिचुकले आणि चर्चेत राहण्यासाठी बिचुकले यांचा हा पब्लिसिटी स्टन्ट आहे अशी चर्चा रंगताना दिसत आहे.