बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुदत आज ७ मार्चला संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच महापालिका निवडणुका झाल्या नसल्यानं मुंबई महापालिकेवर उद्यापासून प्रशासक नेमण्यात येणार आहे. याबाबत राज्य शासनाने ९ फेब्रुवारीला घोषणा केली होती.
प्रशासक केव्हा नेमला जातो?
महापालिकांची मुदत संपेपर्यंत निवडणुका झाल्या नाही तर त्या महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येतो. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने ९ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार असून उद्यापासून पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे
आज स्थायी समितीची शेवटची बैठक
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज शेवटची बैठक पार पडणार आहे. १६० पेक्षा अधिक प्रस्ताव मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. सुमारे पाच हजार कोटींचे हे प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत १८० प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
तब्बल ३८ वर्षानंतर मुंबई पालिकेवर प्रशासक
मुंबई महानगरपालिकेवर पहिल्यांदा १ एप्रिल १९८४ ते २५ एप्रिल १९८५ या कार्यकाळात प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ३८ वर्षानंतर आज महापालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे उद्यापासून महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात दिला जाणार आहे. प्रशासकपदाच्या कार्यकाळात नगरसेवकांना आपल्या पदाचा वापर करता येणार नाही.
पालिकेला आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ
मुंबई महापालिकेला १९७८, १९८५ तसेच १९९० मध्ये मुदतवाढ देण्यात आली होती. १९९० मध्ये महिला आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने १९९० ते १९९२ या दोन वर्षांसाठी महापालिकेला मुदतवाढ देण्यात आली होती.
दरम्यान ओबीसी आरक्षण विधेयकामुळे मुंबई महानगरपालिकेचीही निवडणूक लांबणीवर पडणार असून प्रशासकाचा कार्यकाळही वाढण्याची शक्यता आहे.