Home राजकारण कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या आयुष्यातील पोकळी ‘राष्ट्रवादी जीवलग’ भरुन काढणार

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या आयुष्यातील पोकळी ‘राष्ट्रवादी जीवलग’ भरुन काढणार

362
0
NCP Jivlag
राष्ट्रवादी जीवलग उपक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री ‌अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून “राष्ट्रवादी जीवलग” या उपक्रमाची घोषणा केली आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मायेचा आधार या माध्यमातून दिला जाणार आहे. कोरोनामुळे आई व वडीलांचे‌ छत्र हरपलेले राज्यात जवळपास ४५०‌ ते ४६० बालके‌ आहेत. दोन्ही पालक गमावल्यामुळे या‌ मुलांचे भविष्य‌ अंधकारमय होते‌ की काय, अशी भीती‌ होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने या मुलांचे पालकत्व घेत त्यांना आर्थिक मदत मिळेल, याची तरतूद केली. आर्थिक मदत मिळत असली तरी आपल्या जवळच्या व्यक्तिचे प्रेम, आधार, पाठिंबा, सहकार्य मिळावे यासाठी राष्ट्रवादी‌ काँग्रेस वेल्फेअर ट्रस्ट कडून राष्ट्रवादी‌ जीवलग उपक्रम राबविण्यात येणार असून ४५० ‘राष्ट्रवादी‌ सेवा‌ दूत’ या माध्यमातून या मुलांचे पालक बनणार आहेत.

काय आहे‌ उपक्रम?

फेसबुक लाईव्हद्वारे खा. सुप्रिया सुळे यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती‌ दिली. पालक गमावलेल्या मुलांसाठी सरकार विविध योजना राबवत आहेच. तरिही दैनंदिन जीवनात या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांचे वाढदिवस असतील, शाळेतील पालकांची मीटिंग असेल, खरेदीसाठी किंवा फिरण्यासाठी बाहेर जाण्याचे मन करत असेल, अशा कामांमध्ये सरकार लक्ष घालू शकत नाही. त्यामुळे ‘राष्ट्रवादी‌ सेवा‌ दूत’ ही जबाबदारी उचलतील. राज्यातील ४५० मुलांची‌ जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका‌ कार्यकर्त्याला देण्यात येणार आहे. वर्षभरात त्या मुलांना काय हवं, नको‌ ते पाहण्याचे काम ‘राष्ट्रवादी‌ सेवा‌ दूत’ करतील.


सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, आई-वडीलांचे प्रेम‌ इतर कुणीही देऊ‌ शकत नाहीत. आता पालकत्व गमावलेली मुले नातेवाईंकाकडे राहत आहेत. या नातेवाईकांची रितसर परवानगी घेऊन, जिल्हा प्रशासनाला याची माहिती देऊन आणि सर्वसमंती नंतरच सदर सेवा दूत त्या कुटुंबाशी आणि मुलाशी जोडला जाईल‌. या काळात सरकारी योजनांचा लाभ संबंधित मुला-मुलीला मिळवून देणे, शिक्षण, आरोग्य अशा बाबींमध्ये काही‌ अडचण‌ आल्यास मदत करण्याचे काम राष्ट्रवादीचे सेवा‌ दूत करतील. हा‌ सेवा दूत त्या मुलाचा-मुलीचा‌ काका, मामा, मावशी किंवा आत्या बनून मुलांना जे जवळचे नाते वाटेल त्याप्रमाणे मुलाशी जोडून घेऊन काम करेल.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट कडे या ४५० मुलांचा आणि त्यांच्याशी जोडलेल्या सेवा दूतांची माहिती असलेला सर्व दस्तावेज सार्वजनिक स्वरुपात मांडण्यात येणार आहे, तसेच माझ्या सोशल मीडियावर याची माहिती उपलब्ध असेल, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. हे काम सेवा म्हणून नाही‌ तर सामाजिक उत्तरदायित्व या जबाबदारीतून आम्ही‌ पार पाडत आहोत, असेही त्या म्हणाल्या.

Previous articleवडाळा स्थानकातील व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील धक्कादायक सत्य
Next articleभारतीय संसदेतील शोक प्रस्तावाची सर्वात मोठी यादी काल झाली सादर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here