Home ताज्या बातम्या “लढेंगे और जितेंगे” नाऱ्याला आज पूर्णविराम लागला, प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे...

“लढेंगे और जितेंगे” नाऱ्याला आज पूर्णविराम लागला, प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे वृद्धापकाळात निधन

189
0
शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी पाटील यांचे वृद्धापकाळात निधन

शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाराष्ट्राला लाभलेल्या अनमोल हिरा ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे वृद्धापकाळात निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी एन. डी. पाटील यांची प्राणज्योत मालवली. त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने कोल्हापूर जिल्हातील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

प्राध्यापक एन. डी. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे सामाजिक चळवळीत खर्च केल आहे. नारायण ज्ञानदेव पाटील म्हणजेच महाराष्ट्राला परिचित असलेले प्रा. एन. डी. पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी या गावी एका समान्य शेतकरी कुटुंबात झाला. शाळकरी वयात असतानाच सत्याशोधक विचारांनी ते प्रेरित झाले. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली. पुढे प्राध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेशी त्यांचा संबंध आला. कालांतराने त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ शेतकरी कामगार पक्षासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. पुढे पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहचवून त्यांना विधानपरिषदेवर जाण्याची संधी मिळाली.

एन. डी. पाटील यांनी एक आठवण..

एन. डी. पाटील महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते तेव्हाची एक घटना त्यांच्या साधेपणाच्या वागणुकीचा दाखला देण्यासाठी पुरेशी आहे. एका सकाळी त्यांच्याकडे एक माणूस भेटायला आला. बंगल्यावर कोणीही कर्मचारी नव्हता. तो माणूस सरळ आत गेला. बैठकीच्या खोलीत बसला. बराच वेळ कोणी बाहेर येईना, म्हटल्यावर तो ज्या दिशेने कपडे धुण्याचा आवाज ऐकू येत होता, तिकडे चौकशी करायला गेला. तेव्हा एन डी पाटील त्याला तिथे कपडे धूत बसलेले दिसले. त्या माणसाची चाहूल लागल्यावर त्यांनी वळून बघितलं आणि म्हणाले, “तुम्ही माझ्याकडे आलाय का? जरा थांबा. आलोच मी. आज सुट्टी होती म्हणून कपडे धूत होतो,” तो माणूस ते दृश्य पाहून बघतच राहिला. कारण महाराष्ट्राचे सहकारमंत्री स्वतःचे कपडे धूत, आहेत हे त्याच्या दृष्टीने धक्कादायक होतं. त्यांच्या अशा साध्या वागणुकीच्या अनेक प्रसंगाची गाथा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

‘लडेंगे और जितेंगे’ ही त्यांची आवडती घोषणा होती. ती त्यांच्याच बुलंद आवाजात ऐकायला मिळाली तर आंदोलन बघत उभा असलेल्या बघ्या माणसालाही त्या आंदोलनात सहभागी व्हावं असच वाटे ही त्यांची खरी ओळख. त्यांनी अनेकदा आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह दणादूण सोडले आहे. १८ वर्षे या सभागृहात त्यांनी काम केले.

१९७८ साली त्यांना पुलोद सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामकाजाची आजही चर्चा होते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याची ठरलेली कापूस एकाधिकार योजना त्यांनीच सुरू केली. मंत्री असताना कोणत्याही भूमिपूजन कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अंमलात आणला. एन डी पाटील यांच्यासमोर महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श होता, त्याच आदर्शाने ते आयुष्यभर वागले. सत्तेत जायची संधी मिळाली, पण तेव्हाही त्यांच्या जगण्यात आणि साधेपणात काहीही फरक पडला नाही.

ते जेव्हा सहकारमंत्री होते.तेव्हा त्यांच्या मुलाला सुहास यांना मेडिकलला प्रवेश घ्यायचा होता. एक दोन गुण कमी होते. त्यांनी त्यांचे मामा शरद पवार मुख्यमंत्री होते, वडील एन डी पाटील सहकारमंत्री होते. पण त्यांचा वशिला न लावता रांगेत उभा राहून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. वडिलांचा व्यवसाय या रकान्यात त्यांनी शेती असे लिहिले. पण मामा किंवा वडील यांची ओळख सांगितली नाही.’ अशी आठवण एन डी यांच्या पत्नी सरोजमाई सांगतात.

एन डी पाटील आमदार झाले त्या दिवसापासून आजअखेर आपल्या मानधनातील रक्कम गरीब कार्यकर्त्यांना देतात. अडचणीत असलेल्या कार्यकर्त्याला हातभार लावणारा महाराष्ट्रातील हा एकमेव नेता असेल. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. अशा लढवय्या आणि उदारमतवादी विचारसरणीचा हिरा आज महाराष्ट्राने हरवला. त्यांच्या कार्याला आणि विचारसरणीला भावपूर्ण श्रद्धांजली.

शैक्षणिक क्षेत्रातील कार्य

शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य १९६२
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य १९६५
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य १९६२-१९७८
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन १९७६-१९७८
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य १९९१
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- १९५९ पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – १९९० पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – १९८५ पासून

राजकीय कार्य

१९४८ – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
१९५७ – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
१९६०-६६,१९७०-७६,१९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
१९६९- १९७८, १९८५ – २०१० – शे.का.प.चे सरचिटणीस
१९७८-१९८० – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
१९८५-१९९०- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
१९९९-२००२ – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार
महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते

 

भूषविलेली पदे

रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य
समाजवादी प्रबोधिनी ,इचलकरंजी – उपाध्यक्ष
अंधश्रद्धा निमूर्लन समिती,महाराष्ट्र – अध्यक्ष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी , सातारा – अध्यक्ष
जागतिकीकरण विरोधी कृतिसमिती – मुख्य निमंत्रक
म.फुले शिक्षण संस्था ,इस्लामपूर – अध्यक्ष
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था ,बेळगाव – अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य सीमा प्रश्न समिती – सदस्य

 

 

Previous articleमहाराष्ट्रात येऊन टेस्ला कार बनवा; राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची एलॉन मस्कला ऑफर
Next articleचॉकलेटचं रॅपर कंपनीला पडलं महागात; Nestle KitKat कंपनीने मागितली माफी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here