Home राजकारण ‘शेतकऱ्यांच्या नावाने मोदी सरकार पेट्रोलवर कमवतं ७६ हजार कोटी’

‘शेतकऱ्यांच्या नावाने मोदी सरकार पेट्रोलवर कमवतं ७६ हजार कोटी’

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नावाने पेट्रोलवर ४ रुपयांचा सेस लावते आणि त्यातून वर्षाला ७६ हजार कोटी कमवते. मात्र तरिही कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट मोदी घेत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

306
0
congress agitation farmers issue
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

देशभरातील शेतकरी काळ्या कृषी कायद्यांविरोधात एकवटला असताना मोदी सरकारने त्यांची दखल घेतली नाही. हुकूमशाही वृत्तीच्या या सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्याचे प्रयत्न केले. दहशतवादी, नक्षलवादी, देशद्रोही संबोधून शेतकरी आंदोलनाला बदनाम केले. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलवर अमाप कर वाढवून लूट चालवली आहे. डॉ. मनमोहन सिंह सरकार असताना पेट्रोलवर १ रुपये रस्ते विकास कर होता तो मोदींनी तो १८ रुपये केला आणि त्यावर शेतकऱ्यांच्या नावाने लिटरमागे ४ रुपये सेस असे तब्बल २२ रुपये प्रति लिटरमागे लूट केली जात आहे. शेतकऱ्यांच्या नावावर वसुल केल्या जात असलेल्या ४ रुपयांतून मोदी सरकार दरवर्षी ७६ हजार कोटी रुपये कमावते आणि जुलमी कायदे आणून शेतकऱ्यांना देशोधडीलाही लावत आहे. केंद्रातील सरकार हे ‘हम दो हमारे दो’ चे सरकार आहे, असे पटोले म्हणाले.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीची सर्व मुल्ये, परंपरा पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर नवीन कृषी व कामगार कायदे बनवले. या कायद्यांविरोधात देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत पण मोदी सरकार आपला ताठरपणा सोडायला तयार नाही. या आंदोलनात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. हे जुलमी, अन्यायी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकरी संघटनांकडून आज भारत बंद करण्यात आला असताना पंतप्रधान मोदी मात्र विदेशी गेले आहेत. हा अहंकार असून मोदी सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत तसेच महागाई, बेरोजगारी विरोधात पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने राज्यभर उपोषण करून मोदी सरकारचा धिक्कार केला. मुंबईत मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित होते.

Previous articleकोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर सरकारने नवी नियमावली केली जाहीर..
Next articleआता लहान मुलांनाही मिळू शकते कोरोनावरील लस, चाचणीला लवकरच सुरवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here