महाराष्ट्रात कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. कोरोनाच्या सुरुवातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषवाक्य दिले होते. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असा नारा दिला होता. पण त्यांना स्वतःच्या कुटुंबाचीच जबाबदारी पेलवता आलेली नाही. कारण त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत, अशी टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली.
काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनाच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. सध्या त्या उपचार घेत आहेत. एवढी काळजी घेऊनही मुख्यमंत्र्यांच्या घरातील लोकच कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.
नारायणे राणे म्हणाले की, “कोरोनाने सरकारचेच नाक कापले आहेच. पण मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हे राज्य मागे गेले आहे. आता राज्याला लॉकडाऊन परवडणारे नाही. बेकारी, बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे आमचा लॉकडाऊनला ठाम विरोध आहे. मुख्यमंत्री स्वतः मातोश्रीबाहेर पडत नाहीत. म्हणून काय जनतेनं पण घरी बसावं काय? मग त्यांनी खायचं काय? सरकार त्यांना घरात रेशन पोहोचवणार आहे का?”
तसेच सचिन वाझे प्रकरण, सरकारमधील विविध खात्याच्या भ्रष्टाचाराबद्दलही राणे यांनी सरकारवर तोंडसूख घेतले. सचिन वाझे सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त होता, म्हणूनच वाझे गंभीर गुन्हे करत होता, असा आरोपही त्यांनी केला.