पुढील शब्द वाचले की बातमी कुणी वाचत नाही. संविधान, लोकशाहीची आस्था, पक्षपरंपरा, राजकीय विचारधारा वगैरे वगैरे . हे शब्द घिसेपिटे झालेत का? मग राजकीय आशावाद हा शब्द तर वापरायलाच नको. कारण सध्याची महाराष्ट्रातली राजकीय सुंदोपसुंदी पाहिली तर सामान्य मतदाराचा विचार कुणी करतंय का, यावर विश्वासच बसणार नाही.
पण महाराष्ट्रातल्या राजकारणात जो काही मराठी मातीतला मुलखावेगळा आशावाद उरलाय तो एका नेतृत्वाभोवती फिरतोय. आणि त्या नेतृत्वाचं नाव आहे… खासदार सुप्रिया सुळे. शरद पवारांची मुलगी ही एवढीच ओळख आता सुप्रियाताईंची राहिली नाही. महाराष्ट्रात सर्वदूर स्वीकारलं जाणारं एक प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्व म्हणून लोक आता सुप्रियाताईंमध्ये उद्याचं भवितव्य पाहात आहेत.
महाराष्ट्रात बंडाचं राजकारण रंगत असताना आणि सर्व च्यानेलं केवळ गोहाटी आणि वर्षा-मातोश्रीचं दळण दळत असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र दरवर्षाच्या नित्यनेमाप्रमाणे तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या सोबतीने टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठलाचा जयघोष करताना दिसल्या. डोईवर तुळस घेऊन त्यांनी दिंडीत भाग घेतला. वारीतल्या बायकांसोबत फुगड्या खेळल्या, वारकऱ्यांसाठी भाकऱ्याही थापल्या.
याच पालखी सोहळ्यातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पालखीचे दर्शन घेत असताना तेथील पुरोहित स्वतःच्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल करून सुप्रिया सुळे दर्शनासाठी आल्या असल्याचे दाखवत होता. सुप्रिया सुळेंच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील संकोच न बाळगता त्या पुरोहिताच्या कुटुंबाशी हितगुज साधले. आज राजकारणात विठ्ठल आणि बडवे हे शब्द अतिशय परवलीचे झाले असताना विठ्ठलासाठी निस्वार्थी भावनेने पायी चालत जात असलेल्या वारकऱ्यांकडे मात्र राजकारण्यांचे आणि मीडियाचे दुर्लक्ष होत आहे. अशावेळी सुप्रियाताईंची चर्चा तर होणारच ना.
सुप्रिया सुळेंनी सर्वसामान्यांचं हृदय जिंकलं ते पवारसाहेबांचं निवास्थान सिल्व्हर ओकवर चालून आलेल्या आणि हिंसक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांसमोर धीटपणे सामोरे गेल्यामुळे. सुप्रियाताईंच्या धाडसाचं अवघ्या महाराष्ट्राला कौतुक वाटलं. आक्रमक झालेल्या कामगारांना हात जोडून त्या चर्चेचं आवाहन करत होत्या. तुटपुंजा पोलिस फौजफाटा असताना शेकडो बेभान झालेले आंदोलक आणि पवारसाहेब असलेल्या घराच्या मध्ये सुप्रिया सुळे भिंत बनून उभ्या राहिल्या. महाराष्ट्राच्या या तेजस्विनीचं रूप इथे दिसलं आणि आशावाद बळावला.
सुप्रिया सुळेंचा वावर दिल्लीपासून ते दिवेघाटापर्यंत सर्वत्र असतो आणि तोही लीलया. संसदेत केंद्र सरकारला फर्ड्या इंग्रजीत खडसावणाऱ्या सुप्रियाताई मराठी मातीत आल्या की इथल्या रंगाच्या होऊन जातात. अभिजात मराठीचा झेंडाही खांद्यावर घेतात. महाविकास आघाडीच्या इमेजची काळजीही वाहतात. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकीत राज्याच्या राजकारणात सुप्रिया सुळेंनी स्वतःला अनभिज्ञ ठेवलं नाही. स्वतः विधानभवनात त्या उपस्थित होत्या. आमदारांच्या बैठकांमध्ये त्या हिरीरीने भाग घेत होत्या. राज्यातल्या राजकारणावर त्या आपला प्रभाव निर्माण करतायत. केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावर त्या आक्रमक भूमिका घेतात. देवेंद्र फडणवीसांवर कठोर टीका करतात. गोहाटीत पंचतारांकित हॉटेलमध्ये मजा करणाऱ्या आणि जेट विमानाने फिरणाऱ्या आमदारांचे कोट्यवधीचे बिल कोण देतंय, हा प्रश्नही सर्वप्रथम त्यांनीच उपस्थित करत थेट भाजपवर निशाणा साधला.
सध्याचं राजकारण नेमकं कोणतं वळण घेईल याची खात्री सध्या कुणालाच नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणातली एक महत्त्वाची जागा मात्र सुप्रियाताईंसाठी आता लोकांनीच ठेवायला सुरुवात केली आहे. सुप्रियाताई स्वतःसाठी एक अढळ स्थान निर्माण करणारा ध्रुव तारा होतील हा आता केवळ आशावाद राहिलेला नाही तर ती एक सत्यस्थिती आहे.