एकीकडे हिजाब प्रकरणावरून कर्नाटकातील वातावरण तापले असतानाच कर्नाटकातील भाजपा नेते अधिकाधिक बेजबाबदार वक्तव्ये करून नवनवीन वादांना तोंड फोडत आहेत. एकीकडे भाजपाच्या एका आमदारांनी महिलांच्या पोशाखामुळे बलात्काराच्या घटना घडतात अशी मुक्ताफळं उधळली आहेत. तर दुसरीकडे कर्नाटक सरकारमधील एक मंत्री व भाजप नेते के एस ईश्वरप्पा यांनी नव्या बेजबाबदार विधानाची यात भर घातली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “येत्या काळात, भविष्यात भगवा झेंडा हा भारताचा राष्ट्रध्वज बनेल आणि या देशावर फक्त हिंदू धर्माचेच वर्चस्व राहणार.” सदर विषयात ते पुढे म्हणाले कि, अयोध्येत आम्ही राममंदिर बांधणार असे आम्ही म्हणत होतो, तेव्हा लोक हसायचे. आता आपण ते बांधत आहोत ना?
कर्नाटकातील शिमोगा येथील एका महाविद्यालयात एक मुलगा खांबावर चढून भगवा ध्वज फडकावतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्या विद्यार्थ्यांने राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावला होता. बाकीचे विद्यार्थी खाली जल्लोष करताना दिसत होते.
शेकडो वर्षांपूर्वी श्री रामचंद्रांच्या रथावर भगवे झेंडे होते. तेव्हा आपल्या देशात तिरंगा होता का? आता तो आपला राष्ट्रध्वज आहे त्यामुळे आपण त्याचा आदर राखलाच पाहिजे, यात प्रश्नच नाही, असेही ग्रामविकास मंत्री के एस ईश्वरप्पा म्हणाले.
पत्रकारांमार्फत त्यांना लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवता येईल का? असा देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले कि, आज नाही तर उद्या कधी तरी देशात भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज म्हणून ओळखला जाईल. १०० वर्षे, २०० वर्षे किंवा जास्तीत जास्त ५०० वर्ष लागतील मात्र भगवा ध्वज हा भारताचा राष्ट्रध्वज नक्की होईल.
शिमोगा येथील शासकिय प्रथम श्रेणी महाविद्यालयात मंगळवारी हिजाबच्या विरोधातील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान करुन भगवा ध्वज फडकावला असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी केला. मात्र के. एस. ईश्वरप्पा यांनी शिवकुमारांचे दावे फेटाळून लावत भगवा ध्वज कुठेही फडकवता येईल, पण राष्ट्रध्वज खाली करून तसे झाले असे म्हणता येणार नाही. असे माध्यमांशी बोलताना सांगितले.