मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. गृहरक्षक दलात झालेली बदली अन्यायकारक असल्याचा आरोप करत परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिक दाखल केली होती. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी याचिकेत केली होती.
सुप्रीम कोर्टात न्यायाधीश संजय किशन कौल आणि आर. सुभाष रेड्डी या दोन सदस्यीय खंडपीठाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले. मात्र या प्रकरणाची सुनावणी हायकोर्टात व्हायला हवी, असाही सल्ला देण्यात आला.
यासोबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांना या याचिकेत पक्षकार का करण्यात आले नाही? असाही प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. तसेच परमबीर सिंह यांचे वकील मुकुल रोहतगी यांना हायकोर्टात का गेला नाहीत? असा सवालही विचारण्यात आला. यानंतर रोहतगी यांनी हायकोर्टात याचिका दाखल करु असे सांगितले.