सध्या सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांकडून ‘पूरग्रस्तासाठी केंद्र सरकारची ७०० कोटींची मदत’ अशी एक पोस्ट शेअर केली जात आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत बोलत असताना महाराष्ट्रासाठी ही मदत जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे. मदत जाहीर झाली, हे खरं असलं तरी ही मदत यावर्षीच्या पूरग्रस्तांसाठी नसून ती मागच्या वर्षी आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांच्यासाठी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या ज्या नेत्यांनी या पोस्ट टाकल्या आहेत. त्यांच्या पोस्टना काही लोकांनी ट्रोल केले आहे.
वस्तूस्थिती काय?
मागच्या वर्षी जून ते ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे जी हानी झाली होती त्यासाठी केंद्र सरकारने ही मदत जाहीर केली आहे. एनडीआरएफच्या निकषांनुसार ही मदत दिली जाणार आहे. खरंतर मागच्या वर्षी अतिवृष्टी आल्यानंतर राज्य सरकारने केंद्राकडे ३ हजार ७२१ कोटी रुपयांची मागणी केली होती. या मागणीपैकी फक्त ७०१ कोटी केंद्राने मंजूर केले असून ती मदत यावर्षी मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मागच्या वर्षीच्या पूरात झालेल्या नुकसानीसाठी का असेना पण मदत मिळाल्यामुळे राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. मात्र भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदन व्यक्त करताना ही मदत जणू याच वर्षीच्या पुरासाठी आहे, असे चित्र निर्माण केले. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला होता. काहींनी तर राज्याच्या आधीच केंद्राने मदत केली म्हणून राज्य सरकारवर टीका देखील केली.