मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र एटीएसकडून करण्यात येत होती. आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे या प्रकरणाचा तपास करत होते. दोनच दिवसापूर्वी त्यांनी याचा तपास पुर्ण झाल्याचे फेसबुकवर पोस्ट लिहून सांगितले होते. आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये या प्रकरणात एटीएसने दमण येथून जप्त केलेली व्हॉल्वो गाडी बिल्डर मनिष भतिजाची असल्याचे कळते, हा मनिष भतिजा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जवळचा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची फेसबुक पोस्ट –
मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्विस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय आणि व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात.
याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी २४ एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जातात, त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते.
नवी मुंबईतील मोक्याची जागा कवडीमोल दराने दिली
नवी मुंबईतील सुमारे १७६७ कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ३.६ कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलिस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत.